कशेडी घाट खचल्याने वाहतुकीस धोकादायक
By Admin | Updated: August 11, 2014 22:40 IST2014-08-11T22:31:15+5:302014-08-11T22:40:25+5:30
ऐन गणेशोत्सवात वाहतुकीला अडचण निर्माण होण्याची भीती.

कशेडी घाट खचल्याने वाहतुकीस धोकादायक
चिपळूण : मुंबई - गोवा महामार्गावर असलेल्या कशेडी या अवघड घाटातून सध्या प्रवास करणे अवघड झाले आहे. या घाटातील रस्त्याचा काही भाग खचला असल्याने वाहन चालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर रत्नागिरी व रायगड जिल्ह्याला जोडणारा कशेडी हा अवघड घाट आहे. या घाटात अनेक ठिकाणी अवघड वळणे आहेत. शिवाय रस्ताही अरुंद आहे. रस्त्याच्या एका बाजूला डोंगर आहे, तर दुसऱ्या बाजूला खोल दरी आहे.
पावसाळ्यात अनेक ठिकाणी लहान मोठे धबधबे कोसळतात. बहुतांश ठिकाणी दगड किंवा दरड कोसळून खाली येते. त्यामुळे वाहतुकीला अडचण निर्माण होते. दुसऱ्या बाजूला खोल दरी असल्याने वाहन चालकांना कसरत करावी लागते. या घाटात अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे येथून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
या मार्गावर कशेडी ते पोलादपूर दरम्यानच्या रस्त्यावर भोगावजवळ २००५ मध्ये झालेल्या अतिवृष्टीच्या काळात महामार्ग खचला होता. खाली असणाऱ्या कातळावर असलेला जमिनीचा भूभाग खचल्याने येथील वाहतूक ठप्प होती. त्यानंतर अनेक वेळा येथील रस्त्याची डागडुजी करण्यात आली. परंतु, दरवर्षी येथे तोच तोच प्रकार कायम घडतो व जमीन खचते. यावर कायमस्वरुपी उपाययोजना सार्वजनिक बांधकाम खाते व राष्ट्रीय महामार्ग खाते करीत नसल्याने ही समस्या कायम आहे. या संपूर्ण रस्त्यात खाली असणाऱ्या दगडामध्ये पिलर उभे करुन पूल बांधला तर पावसाळ्यात ही समस्या टळू शकते. परंतु, सध्या तरी चालकांना कसरत करुन येथून वाहतूक करावी लागत आहे.
दरम्यान, ऐन पावसाळ्यात आणि गणेशोत्सवापूर्वी हा घाट खचू लागल्याने वाहनचालक भयग्रस्त झाले आहेत. यावर आतापासूनच उपाययोजना करण्याची मागणी वाहनचालकांतून करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)
1रत्नागिरी-रायगड जिल्ह्यांना जोडणारा कशेडी घाट अवघड वळणांचा तसेच अरूंद रस्त्यांचा असल्याने या घाटातून गाडी सावकाश हाकावी लागते. त्यातच आता हा मार्ग खचू लागला आहे.
2अनेक ठिकाणी लहान-मोठे धबधबे असल्याने रस्त्याखालील माती सरकते. काही ठिकाणी दगड किंवा दरड कोसळून खाली येते. ऐन गणेशोत्सवात वाहतुकीला अडचण निर्माण होण्याची भीती.