धोकादायक इमारतींना रविवारपर्यंत मुदत
By Admin | Updated: April 27, 2017 00:19 IST2017-04-27T00:19:55+5:302017-04-27T00:19:55+5:30
पावसाळ्यापूर्वी करण्यात आलेल्या सर्वेक्षणात मुंबईतील ८१२ इमारती मोडकळीस आल्याचे उजेडात आले आहे. वारंवार धोक्याची सूचना

धोकादायक इमारतींना रविवारपर्यंत मुदत
मुंबई : पावसाळ्यापूर्वी करण्यात आलेल्या सर्वेक्षणात मुंबईतील ८१२ इमारती मोडकळीस आल्याचे उजेडात आले आहे. वारंवार धोक्याची सूचना करूनही अशा इमारतींमधील रहिवासी घर सोडून जाण्यास तयार नाहीत. त्यामुळे महापालिकेने धोकादायक इमारतींतील रहिवाशांना ३० एप्रिलपर्यंतची मुदत दिली आहे. त्यानुसार रविवारपर्यंत ही मुदत पाळून घर रिकामे न करणाऱ्या रहिवाशांचा पाणीपुरवठा खंडित करण्यात येणार आहे.
पावसाळापूर्व कामांचा आढावा घेण्यास महापालिका प्रशासनाने सुरुवात केली आहे. दर पावसाळ्यात म्हाडा आणि महापालिकेमार्फत मुंबईतील इमारतींचे सर्वेक्षण करण्यात येते. यंदा या सर्वेक्षणात ८१२ इमारती धोकादायक आढळल्या आहेत. यापैकी अतिधोकादायक इमारती पावसाळ्यापूर्वी खाली करून त्या पाडण्यावर महापालिकेचा भर आहे. या यादीमध्ये सरकारी, खाजगी आणि महापालिकेच्या मालकीच्या अशा सर्वच इमारतींचा समावेश आहे. डॉकयार्ड रोड येथील इमारत दुर्घटनेनंतर शहाणपण आलेल्या महापालिकेने अतिधोकादायक इमारतींना नोटिसा पाठवणे, इमारती रिकाम्या करणे, त्यांचे वीज-पाणी तोडणे अशी कारवाई सुरू केली आहे.
या कारवाईआधी येथील रहिवाशांना नोटीस पाठवून मुदत देण्यात आली आहे. ही मुदत ३० एप्रिलपर्यंत असल्याने येथील रहिवासी हवालदिल झाले आहेत. यापैकी खाली केलेल्या १२८ इमारतींपैकी १४ इमारतींतील रहिवाशांनी न्यायालयातून स्थगिती आणली आहे. त्यामुळे त्या इमारती महापालिकेला पाडत्या आलेल्या नाहीत. तर २१ इमारतींचे स्ट्रक्चरल आॅडिट वादात सापडल्यामुळे ही प्रकरणे पालिकेच्या तांत्रिक सल्लागार समितीकडे सोपवण्यात आली आहेत. महापालिकेच्या १३१ इमारतींपैकी ८३ इमारतींवर तातडीने कारवाई करावी, असे आदेश सर्व सहाय्यक आयुक्तांना देण्यात आले आहेत. आतापर्यंत १५२ इमारतींचे पाणी आणि वीज कापण्यात आली आहे. तर १७० इमारतींचे पाणी कापण्याचे बाकी असून, त्यांच्यावर ३० एप्रिलपर्यंत कारवाई होणार आहे. (प्रतिनिधी)