ठाण्यात वाढल्या धोकादायक इमारती
By Admin | Updated: June 13, 2014 01:10 IST2014-06-13T01:10:38+5:302014-06-13T01:10:38+5:30
शीळ प्रकरणाचा मनपाच्या अधिकाऱ्यांनी प्रचंड धसका घेतला असल्यामुळे जुन्या इमारतींसह असंख्य नवीन इमारतींचा समावेश धोकादायकमध्ये करण्यात आला आहे
ठाण्यात वाढल्या धोकादायक इमारती
नामदेव पाषाणकर, ठाणे -
शीळ येथील आदर्श इमारत कोसळून ७४ जणांचा बळी गेल्याप्रकरणी ठाणे महापालिकेच्या नऊ कर्मचारी-अधिकाऱ्यांना तुरुंगाची हवा खावी लागल्याने यापुढे कुठलीही आफत नको म्हणून मुंब्य्रातील धोकादायक इमारती निश्चित करताना मनपाच्या शाळा, व्यायामशाळा, स्मशानभूमी, जलकुंभासह १ हजार ३४२ वास्तू धोकादायक ठरवण्यात आल्या आहेत. गतवर्षी येथे अवघ्या १४५ इमारती धोकादायक होत्या. या वर्षी धोकादायक वास्तूंची नऊ प्रभागांतील संख्या २ हजार ५४४ इतकी आहे.
शीळ प्रकरणाचा मनपाच्या अधिकाऱ्यांनी प्रचंड धसका घेतला असल्यामुळे जुन्या इमारतींसह असंख्य नवीन इमारतींचा समावेश धोकादायकमध्ये करण्यात आला आहे. गेल्या वर्षी १ हजार १३७ वास्तू धोकादायक होत्या. मुंब्य्रात धोकादायक इमारतींची संख्या वाढली असताना वागळे इस्टेटमध्ये २१ व कळव्यातील १३ इमारती धोकादायकमधून वगळण्यात आल्या. या इमारती तेथील रहिवाशांनी रंगरंगोटी व रिपेअर केल्यामुळे त्या सुरक्षित असल्याचा निष्कर्ष काढण्यात येत आहे. राजकीय दडपणामुळे अधिकारी गुपचूप ही गोष्ट मान्य करताना दिसत असले तरी यापुढे आम्ही कुठलीही रिस्क घेऊन जीव धोक्यात घालणार नसल्याचे एका अधिकाऱ्याने नाव न घेण्याच्या अटीवर सांगितले.
कोपरीत २५ शासकीय इमारती, नौपाड्यातील शारदा विद्यामंदिर, कौपिनेश्वर, दत्त मंदिर, ठामपा कर्मचारी निवास, मीनाताई ठाकरे परिचर्या प्रशिक्षण संस्था, उथळसरमधील पुंजाणी इंडस्ट्रीयल इस्टेट, श्रीरंग सोसायटीतील १३ इमारती, वागळे इस्टेटमध्ये शीख धर्मीयांचे गुरुद्वारा, माजी नगरसेवक विजय पडवळ यांचे पडवळ विद्यालय, नगरसेवक मनोज शिंदे यांचे मनोज भवन, रायलादेवी प्रभागात प्रकाशानंद विभूमी विद्यालय, राजर्षी शाहू विद्यालय, कामगार हॉस्पिटलच्या २७ इमारती, माजिवडा येथील चाचा नेहरू हिंदी शाळा, मुंब्य्रातील होली स्पिरीट, सिम्बॉयसिस शाळेसह मनपाच्या शाळा क्रमांक ४९, ९३, १२९, २८, १२४, ७७, ७६, ११८, १००, २५, ८१, ८५, ८७, ९० व ९१ या इमारती धोकादायक घोषित केल्या आहेत. शाळा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर ही आकडेवारी धोकादायक आहे.