Danger on Malabar Hill persists | मलबार हिलवरील धोका कायम

मलबार हिलवरील धोका कायम

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गेल्या महिन्यात मुसळधार पावसामुळे बी.जी. खेर मार्ग येथे मलबार हिलवरील संरक्षक भिंत कोसळून रस्त्याला तडे गेले होते. बुधवारी पुन्हा या घटनेची पुनरावृत्ती मलबार हिल येथील खारेघाट परिसरात घडली. टेकडीवरून कोसळणाऱ्या मातीचा ढिगारा पायथ्याशी असलेल्या इमारतीच्या तळमजल्यावरील घरात शिरला. या दुर्घटनेत सुदैवाने कोणाला इजा झाली नाही. मात्र टेकडीचा भाग धोकादायक होत असल्याचे निदर्शनास आले आहे.


मलबार हिल टेकडीवरून एन. एस. पाटकर मार्गावर भूस्खलन होऊ नये, यासाठी एक संरक्षण भिंत बांधण्यात आली आहे. ही भिंत कमला नेहरू पालखीतून केम्स कॉर्नरच्या दिशेने जाणारा बी. जी. खेर मार्ग आणि बाबुलनाथकडून केम्स कॉर्नर जंक्शनच्या दिशेने जाणाºया एन. एस. पाटकर मार्गादरम्यान आहे. ५ आॅगस्ट रोजी मुंबईत झालेल्या मुसळधार पावसात या भिंतीचा काही भाग कोसळून बी. जी. खेर मार्गाचे मोठे नुकसान झाले. ही संरक्षक भिंत धोकादायक बनल्यामुळे एन. एस.पाटकर मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला.


मलबार टेकडीचा परिसर सुरक्षित करण्यासाठी आयआयटी, मुंबईतील तज्ज्ञ प्राध्यापकांची नेमणूक करण्यात आली आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर पावसाळा संपताच पालिका कामाला सुरुवात करणार आहे. दरम्यान, मंगळवारी पुन्हा मुंबईत मुसळधार पाऊस झाल्यामुळे बुधवारी मलबार हिल येथील खारेघाटजवळ दरड कोसळली. नजीकच्या पारसी कॉलनीजवळील इमारत क्रमांक पाचची संरक्षण भिंत कोसळून दुमजली इमारतीच्या तळमजल्यावर चिखल व मातीचे पाणी शिरले.


परिसरातील इमारती ८० वर्षे जुन्या
या इमारतीमध्ये सहा फ्लॅट असून तळमजल्यावरील एका फ्लॅटमध्ये पाच फूट मातीचा ढीग साचला आहे. या परिसरातील इमारती ८० वर्षे जुन्या आहेत. त्यामुळे प्रतिबंधक उपाय म्हणून काही काळासाठी तळमजला आणि पहिल्या मजल्यावरील फ्लॅट रिकामे करण्यात आले.
टेकडी परिसरात भूस्खलनाचा धोका असल्याने मंगळवारी रात्री या परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी पालिकेने कर्मचारी तैनात केले होते. बुधवारी दरड कोसळल्यानंतर टेकडीवरील धोकादायक भाग गुरुवारी सकाळी पाडण्यात आला. त्यामुळे हा परिसर आता सुरक्षित असून सध्या कोणता धोका नाही, असे पालिका अधिकाºयाने सांगितले.
आयआयटी, मुंबईतील तज्ज्ञ प्राध्यापकांचा टेकडीबाबतचा अहवाल लवकरच सादर होणार आहे. त्यानंतर योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे ‘डी’ विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी सांगितले.

मलबार टेकडीचा परिसर सुरक्षित करण्यासाठी आयआयटी, मुंबईतील तज्ज्ञ प्राध्यापकांची नेमणूक करण्यात आली आहे. टेकडीच्या तपासणीसाठी मातीचे नमुने घेण्यात आले असून, या परिसराची ड्रोनद्वारे पाहणीही करण्यात आली आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर पावसाळा संपताच पालिका कामाला सुरुवात करणार आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Danger on Malabar Hill persists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.