१२२ कुटुंबांचा जीव धोक्यात
By Admin | Updated: June 29, 2015 06:12 IST2015-06-29T06:12:07+5:302015-06-29T06:12:07+5:30
शासनाच्या दुर्लक्षामुळे चुनाभट्टीतील १२२ गिरणी कामगार कुटुंबे गेल्या अनेक वर्षांपासून जीव मुठीत धरून जीवन जगत आहेत.

१२२ कुटुंबांचा जीव धोक्यात
समीर कर्णूक, मुंबई
शासनाच्या दुर्लक्षामुळे चुनाभट्टीतील १२२ गिरणी कामगार कुटुंबे गेल्या अनेक वर्षांपासून जीव मुठीत धरून जीवन जगत आहेत. ते राहत असलेल्या इमारतीची सध्या अत्यंत दयनीय स्थिती झाली आहे. ही इमारत केव्हाही कोसळू शकते, अशा स्थितीत आहे. मात्र शासन दरबारी न्यायच मिळत नसल्याने आमचा जीव गेल्यावरच शासनाला जाग येईल का, असा संतप्त सवाल या रहिवाशांकडून करण्यात येत आहे.
चुनाभट्टी परिसरात ही टाटा नगर इमारत १९६० च्या दरम्यान उभारण्यात आली. या परिसरात असलेल्या स्वदेशी मिलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना या इमारतीमध्ये घरे देण्यात आली. तेव्हापासून या इमारतीत १२२ कुटुंबे वास्तव्यास आहेत. मात्र या इमारतीची योग्य डागडुजी न झाल्याने काही वर्षांतच इमारतीची दयनीय अवस्था झाली. त्यातच २००१ मध्ये ही स्वदेशी मिल बंद झाल्याने या इमारतीच्या डागडुजीकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले. त्यानंतर इमारतीच्या छतामाधून पाणी येणे, स्लॅब कोसळणे अशा घटना रोजच या ठिकाणी पाहायला मिळत होत्या. सध्या तर ही इमारत बाहेरून एखाद्या खिंडारासारखी दिसत आहे. त्यामुळे या इमारतीमध्ये कोणी राहत असेल, यावर विश्वासदेखील बसणार नाही. मात्र दुसरा कुठलाही पर्याय नसल्याने गेल्या अनेक वर्षांपासून हे गिरणी कामगार निमूटपणे या इमारतीत राहत आहेत.
त्यात गेल्या ९ वर्षांपासून महानगरपालिका प्रत्येक वर्षी या इमारतीला धोकादायक असल्याची नोटीस लावून जात आहे. तसेच रहिवाशांनी तत्काळ घरे रिकामी करावी, अशा सूचनादेखील पालिकेने वारंवार दिल्या आहेत. मात्र यातील अनेक कुटुंबांची तिसरी पिढी याच इमारतीत राहत आहे. अनेकांचे बालपण याच इमारतीत गेले आहे. या कुटुंबांचे मुंबईत दुसरे घर घेण्याची आर्थिक क्षमता नाही. त्यामुळे पालिकेने आमचे याच परिसरात पुनर्वसन करावे़ त्यानंतर आम्ही तत्काळ घरे रिकामी करू, असे येथील रहिवाशांनी सांगितले.
स्वदेशी मिलकडून या इमारतीबाबत काहीच हालचाली होत नसल्याने २०१२मध्ये हा वाद न्यायालयात गेला. तेव्हापासून हे रहिवासी हक्काच्या घरासाठी लढा देत आहेत. मात्र इमारतीची अवस्था पाहून ती कधीही कोसळू शकते, अशी स्थिती आहे. त्यामुळे शासनाने तत्काळ आमच्याकडे लक्ष देऊन आमचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी येथील रहिवाशांकडून करण्यात येत आहे.
परिसरात घाणीचे साम्राज्य
त्रिकोणी टाईपमध्ये असलेल्या या इमारतीच्या मधोमध एक मोठे मैदान आहे. तसेच इमारतीच्या परिसरातदेखील मोठ्या प्रमाणात मोकळी जागा आहे. मात्र कित्येक वर्षांपासून या ठिकाणी पालिकेकडून साफसफाई न झाल्याने इमारतीच्या परिसरात कचऱ्याचे ढीग जमा झाले आहेत. त्यामुळे सध्या या ठिकाणी दुर्गंधीसह मोठ्या प्रमाणात डासांचे प्रमाणदेखील वाढले आहे. परिणामी या ठिकाणी मलेरिया आणि डेंग्यूसारखे आजार नेहमीच होत असतात.