चार वर्षांत डम्पिंगला पन्नास वेळा आग
By Admin | Updated: February 29, 2016 03:45 IST2016-02-29T03:45:39+5:302016-02-29T03:45:39+5:30
देवनार डम्पिंग ग्राउंडच्या आगीचा प्रश्न अद्यापही ज्वलंत आहे. शनिवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारासही येथे पुन्हा आग लागल्याची घटना घडली होती

चार वर्षांत डम्पिंगला पन्नास वेळा आग
मुंबई : देवनार डम्पिंग ग्राउंडच्या आगीचा प्रश्न अद्यापही ज्वलंत आहे. शनिवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारासही येथे पुन्हा आग लागल्याची घटना घडली होती. सुदैवाने घटनास्थळी दोन फायर इंजिन आणि दोन फायर टँकर्स तैनात असल्याने आग पसरली नाही, परंतु डम्पिंगच्या आगीच्या घटना सातत्याने वाढतच असून, २०१२ ते १५ या चार वर्षांत तब्बल ५० वेळा डम्पिंगला आग लागण्याची घटना घडली आहे.
फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देवनार डम्पिंगला लागलेल्या आगीने मुंबईकरांचे हाल झाले. वातावरणातील धुराने शहराच्या प्रदूषणात भर पडली. वातावरणात डम्पिंगच्या आगीच्या धुरासह वाहनांचा धूर आणि धुलीकणांचीही भर पडल्याने, प्रदूषित हवा मुंबईकरांसाठी त्रासदायक ठरली. याच काळात वातावरणात होत असलेल्या बदलामुळे मुंबईची प्रदूषित हवा ‘सायलंट किलर’ ठरू लागली. शिवाय दिल्लीच्या तुलनेत मुंबई अधिकाधिक प्रदूषित असल्याची नोंद या वेळी ‘सफर’ने केली.
डम्पिंगच्या आगीचा प्रश्न जुना असूनदेखील महापालिकेने यावर ठोस अशा उपाययोजना आखलेल्या नाहीत. त्यामुळे आगीचा प्रश्न दिवसेंदिवस वाढत असून, या मुद्द्याला पकडून महापालिकेच्या विरोधी पक्षांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले आहे. (प्रतिनिधी)
१२०१२ साली देवनार, मुलुंड, घाटकोपर पूर्वेकडील गोदरेज डम्पिंग येथे आग लागली होती. विशेषत: या सर्व घटना रात्रीच्या वेळेस घडल्या होत्या.
२२०१३ साली देवनार डम्पिंगच्या तुलनेत मुलुंड येथील डम्पिंगला सर्वाधिक वेळा आग लागली. शिवाय या आगीत गोरेगाव लिंक रोडवरील ओशिवरा डम्पिंगच्या आगीचाही समावेश होता. दुपार आणि सायंकाळच्या काळात या आगी लागल्या होत्या.
३२०१४ साली मुलुंड डम्पिंगला दोन वेळा तर देवनार डम्पिंगला तीन वेळा आग लागली होती. दुपारसह सायंकाळी या आगी लागल्या होत्या.
४मागील तीन वर्षांच्या तुलनेत २०१५ साली डम्पिंग ग्राउंडला सर्वांत जास्त वेळा आग लागली. या आगीची संख्या २५ एवढी होती. देवनार डम्पिंगला सर्वात जास्त वेळा आग लागली असून, या आगीचा आकडा १४ एवढा आहे. त्या खालोखाल मुलुंड आणि शिंपोली डम्पिंगच्या आगीचा समावेश आहे.
५डम्पिंगवर लागलेली आग विझवण्यासाठी महापालिकेच्या एम/पूर्व विभागाने मुंबई अग्निशमन दलास ‘मॅग्नेशियम क्लोराइड’ उपलब्ध करून दिले आहे.