दामलेंचा अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न
By Admin | Updated: June 6, 2015 01:53 IST2015-06-06T01:53:41+5:302015-06-06T01:53:41+5:30
बदलापूर ग्रामीण भागात दरोडा आणि दंगल माजविणे अशा गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्णांप्रकरणी नगरसेवक आशीष दामले याचे नाव आले आहे.

दामलेंचा अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न
बदलापूर : बदलापूर ग्रामीण भागात दरोडा आणि दंगल माजविणे अशा गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्णांप्रकरणी नगरसेवक आशीष दामले याचे नाव आले आहे. हे प्रकरण राज्यभर गाजल्याने या प्रकरणातून सुटका करून घेण्यासाठी दामले अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न करीत आहे. कल्याण सत्र न्यायालयात या प्रकरणी शनिवारी सुनावणी होणार आहे. या प्रकरणात अटक आरोपींची संख्या ९ झाली आहे.
दामलेने आपल्या समर्थकांसह एका आश्रमात स्वत:च्या पोलीस बंदोबस्तासह दरोडा घातल्याचा व दंगल माजविण्याचा गुन्हा ग्रामीण पोलिसांनी नोंदविला आहे. या प्रकरणी गेले दोन दिवस उलटसुलट चर्चाही झाली. मात्र, आता हे प्रकरण कलाटणी घेताना दिसत आहे. तो आश्रमातील एका मुलीला सोडविण्यासाठी गेल्याचे सांगण्यात येत आहे. ही मुलगी त्याच्या ओळखीतील असल्याने तिनेच त्याला फोन करून सुटकेची विनवणी केल्याचे पुढे येत आहे. या मुलीला आश्रमात तिच्या मनाविरोधात का ठेवण्यात आले याचाही आता शोध घेण्याची गरज व्यक्त होत आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही ही मुलगी दामलेसोबत दिसत आहे. ती स्वत:च गेल्याचे चित्रीकरणात दिसत आहे. यामुळे दामले दरोडा टाकण्यासाठी गेला की, मुलीची आश्रमातून सुटका करण्यासाठी, याबाबत संंभ्रम निर्माण झाला आहे.
दामले याने समर्थकांसह आश्रमावर घातलेल्या दरोड्याप्रकरणी आतापर्यंत ९ जणांना अटक केली आहे. त्यात गुरुवारी प्रशांत गायकवाड याला तर शुक्रवारी मिलिंद गोरे, संकल्प लेले, वसंत लांघी, योगेश पाटील, हरीश घाडगे, संतोष कदम, अभिजित दुर्वेकर आणि उमेश लोखंडे यांना अटक केली आहे.