दमण दुहेरी हत्याकांडातील म्होरक्याला मुंबईत बेड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 06:00 IST2018-06-17T06:00:51+5:302018-06-17T06:00:51+5:30
गुटखा व भंगारच्या अवैध व्यवसायातील गँगवॉरमधून दमण येथे दोन व्यावसायिकांची गोळी झाडून हत्या करण्यात आली.

दमण दुहेरी हत्याकांडातील म्होरक्याला मुंबईत बेड्या
मुंबई : गुटखा व भंगारच्या अवैध व्यवसायातील गँगवॉरमधून दमण येथे दोन व्यावसायिकांची गोळी झाडून हत्या करण्यात आली. हत्येनंतर मुंबईत लपून बसलेल्या म्होरक्याला गुन्हे शाखेच्या कक्ष ३ ने शनिवारी बेड्या ठोकल्या आहेत. मोहम्मद हसन अब्दुल अजीज सिद्धिकी (४४) असे आरोपीचे नाव आहे.
दमणच्या मेन रोड दाभेल येथील विशाल बार अँड रेस्टारंटमध्ये व्यावसायिक अजय रमण पटेल (३५), धीरेंद्र पटेल (३४) यांच्यावर १ एप्रिलला चाकू, तलवारीने हल्ला करण्यात आला. त्यानंतर, ५ ते ६ जणांनी त्यांच्यावर गोळी झाडून हत्या केली. गुटखा आणि भंगार विक्रीच्या अवैध व्यवसायातून गँगवॉर भडकले. आण यातूनच ही हत्या झाली. दमण पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
आरोपी मुंबईत लपून बसल्याचा संशय दमण पोलिसांना होता. त्यामुळे त्यांनी मुंबई पोलिसांची मदत घेतली. घटनेची माहिती मिळताच, गुन्हे शाखेच्या कक्ष ३ चे प्रभारी पोलीस निरीक्षक जगदिश साईल यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने खबऱ्यांच्या मदतीने पथकाने तपास सुरू केला. त्याच दरम्यान भायखळा परिसरात या हत्याकांडातील मुख्य सूत्रधार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, तब्बल ७२ तास पाळत ठेवल्यानंतर शनिवारी त्याला भायखळा येथून अटक करण्यात आली. त्याचा ताबा दमण पोलिसांकडे देण्यात आला.