Join us

वेरावली जलवाहिनीला हानी, कंत्राटदाराला एक कोटींचा दंड

By जयंत होवाळ | Updated: December 5, 2023 20:57 IST

२९ नोव्हेंबर रोजी मेट्रोचे काम सुरु असताना जलवाहिनी फुटली होती.

मेट्रो मार्ग सहाचे काम सुरु असताना वेरावली जलवाहिनीला हानी पोहोचून  पाण्याची मोठ्या प्रमाणवर नासाडी झाल्याप्रकरणी मुंबई महापालिकेने  मे . ईगल इन्फ्रा प्रा. ली. या कंपनीला १ कोटी ३३ लाख ६२ हजार ४१२ रुपयांचा दंड ठोठावला आहे. पाण्याची नासाडी २८ लाख २० हजार ८३० रुपये, दुरुस्ती खर्च ६० लाख ८७ हजार ४४४ रुपये, ( पाण्याची नासाडी आणि दुरुस्ती खर्च असे मिळून एकूण ८९ लाख ८ हजार २७४ रुपये),  दंड ४४ लाख ५४ हजार १३७ रुपये असे मिळून १ कोटी ३३ लाख ६२ हजार ४१२ रुपयांचा दंड आकारला आहे.

२९ नोव्हेंबर रोजी मेट्रोचे काम सुरु असताना जलवाहिनी फुटली होती. या ठिकाणी काम करत असताना भूगर्भात असलेल्या जलवाहिन्या आणि त्या ठिकाणी काम करताना कोणती काळजी घ्यावी यासाठी पालिकेने दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन आणि एमएमआरडीए समवेत २५ नोव्हेंबर    रोजी बैठक घेतली होती.  या बैठकीत पालिकेने काम करण्याबाबत काही सूचना केल्या होत्या.

प्रत्यक्षात या सूचनांचे पालन झाले नाही , त्यामुळे जलवाहिनी फुटून पाण्याची मोठी नासाडी झाली. शिवाय पाणी पुरवठा खंडित झाल्यामुळे स्थानिकांना मनस्ताप सहन करावा लागला. या पार्शवभूमीवर पालिकेने कारवाईचे पाऊल उचलले आहे.  

टॅग्स :मुंबई महानगरपालिकापाणी