Dahisar will now be a new tourist destination | दहिसर होणार आता नवे पर्यटन स्थळ

दहिसर होणार आता नवे पर्यटन स्थळ

\Sदहिसर होणार आता नवे पर्यटन स्थळ

दहिसरकरांना मिळणार कांदळवन उद्यान व एनर्जी पार्क

मनोहर कुंभेजकर

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबईचे शेवटचे टोक दहिसर आहे, तर दहिसर पश्चिम प्रभाग क्रमांक १ पासून पालिकेच्या वॉर्डची सुरुवात होते. दहिसरच्या शिरपेचात मनाचा तुरा रोवला जाणार असून मुंबईच्या नकाशात भविष्यात येथे साकारणाऱ्या एनर्जी पार्क, कांदळवन उद्यान व कचऱ्यापासून वीजनिर्मिती या विविध प्रकल्पांमुळे मुंबईच्या नकाशावर आता दहिसरची ओळखही नवे पर्यटन स्थळ म्हणून होणार आहे.

आदित्य ठाकरे यांच्या समवेत विभागातील विविध समस्यांबाबत चर्चा करण्याकरिता सह्याद्री अतिथीगृहात नुकतीच एक बैठक आयोजित केली होती. स्थानिक नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी आपल्या दहिसर प्रभाग क्रमांक १ मधील विविध नागरी समस्या प्रश्नांबाबत यावेळी निवेदन सादर केले. विभागप्रमुख व आमदार विलास पोतनीस, मुंबै बँकेचे संचालक व माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यावेळी उपस्थित होते. यावेळी येथील समस्या लवकर सोडवण्याचे आश्वासन मंत्रिमहोदयांनी दिले.

कांदळवन उद्यान

दहिसर पश्चिम सीटीएस क्रमांक १९२९ ते १९३१ या ठिकाणी कांदळवन उद्यान प्रस्तावित आहे. महाराष्ट्र निसर्ग पर्यटन महामंडळाकडून सदर प्रकल्प निसर्ग पर्यटन प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आला आहे. या ठिकाणी एमसीझेड व सीआरझेड परवानगी प्राप्त आहे. यासंदर्भात आराखडा तसेच मार्गदर्शन करण्याची मागणी घोसाळकर यांनी आदित्य ठाकरे यांच्याकडे केली.

एनर्जी पार्क

शहीद तुकाराम ओंबळे मैदानात एनर्जी पार्क करण्याबाबतचा प्रस्ताव महानगरपालिकेकडे देण्यात आला आहे. या ठिकाणी एक आगळेवेगळे पर्यटन स्थळ निर्माण होईल. तरी या प्रकल्पासाठी मुंबई महानगरपालिकेतर्फे आराखडा उपलब्ध करून देण्याची मागणी तेजस्वी घोसाळकर यांनी यावेळी केली.

--------------------------------

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Dahisar will now be a new tourist destination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.