Join us  

१०० झोपड्यांनी अडवली दहिसर नदी; पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी न लागल्याने काम संथगतीने

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2024 10:26 AM

नदीच्या पुनरुज्जीवनाचा प्रकल्प प्रगतिपथावर.

मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात उगम पावणाऱ्या आणि मनोरी खाडीत विसावणाऱ्या दहिसरनदीच्या गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या पुनरुज्जीवनाचे काम नदीच्या किनारी वसलेल्या १०० झोपड्यांमुळे अडले आहे. २४६ कोटींच्या (मेटेनन्सचा खर्च धरून) या प्रकल्पाचे काम ऑक्टोबर, २०२१ पासून सुरू झाले. ऑक्टोबर, २०२४ पर्यंत प्रकल्पाचे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे; मात्र दहिसरमधील आंबावाडी, एकतानगर, संजयनगर, गावठाणातील १०० हून अधिक झोपड्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी न लागल्याने प्रकल्पाचे काम संथगतीने सुरू आहे. आतापर्यंत प्रकल्पाचे ५५ टक्के इतके काम पूर्ण झाले आहे.

झोपडपट्ट्यांमधून सांडपाणी नदीत सोडले जात असल्याने ही नदी कमालीची प्रदूषित झाली आहे. नदीचे पाणी पूर्णपणे काळवंडून गेले आहे. नदीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी सांडपाणी, कचरा नदीत जाण्यापासून रोखणे आवश्यक आहे. 

 ...तर सुशोभीकरण शक्य 

दहिसर नदी १२ किलोमीटरच्या परिसरातून वाहते. ब्रिमस्टोवॅड प्रकल्पानंतर नदीचे पात्र रुंद करण्यात आले. नदीच्या आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षराजी आहे. पुनरुज्जीवन झाल्यानंतर नदीच्या आजूबाजूच्या परिसराच्या सुशोभीकरणाची योजना आहे; मात्र त्यासाठी प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे.

आतापर्यंत प्रकल्पाचे काम पूर्ण :

नदीच्या मार्गात दोन ठिकाणी सांडपाणी पुनर्पक्रिया प्रकल्प बांधण्यात आले आहेत; मात्र झोपडपट्ट्यातून येणारे सांडपाणी मलनिस्सारण वाहिन्यांच्या माध्यमातून अडवून आणि जमा करून सीटीपीपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. त्यासाठी नदीच्या काठावरील काही बांधकामे, खासकरून झोपड्या हटविणे आवश्यक आहे.

दहिसर नदीचे क्षेत्र :

नॅशनल पार्क, श्रीकृष्णनगर, दौलतनगर, लेप्रसी कॉलनी, कांदरपाडा, संजयनगर, दहिसर गावठाण, राजेंद्र सिंह यांचेही प्रयत्न  

 नदीच्या पुनरुज्जीवनासाठी काही वर्षांपूर्वी मॅगसेसे पुरस्कार विजेते आणि जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांनीही प्रयत्न केले होते.

 त्यावेळी दहिसरसह मिठी, ओशिवरा, पोईसर या नद्या टिकविण्यासाठी राजेंद्र सिंह यांनी सूचना केल्या होत्या; तसेच नदीच्या किनारी रिव्हर मार्च काढून जनजागृतीही केली होती.

नदीच्या काठावरील सहा मीटरचा परिसर मोकळा करणे आवश्यक आहे. त्यासाठी काही बांधकामे हटवावी लागतील. काही झोपड्यांचे झोपू योजनेत पुनर्वसन होणार आहे. ते झाले तर प्रकल्पाच्या कामाला वेग येईल - नयनीश वेंगुर्लेकर, सहाय्यक आयुक्त, आर नॅार्थ.

टॅग्स :दहिसरनदी