दहिसर, पवईतून अजगरासह सापाची सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:05 IST2021-04-12T04:05:18+5:302021-04-12T04:05:18+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क मुंबई : दहिसर आणि पवई परिसरातून शनिवारी दोन सापांची सुटका करण्यात आली. एसीएफ आणि पॉज संस्थेतील ...

दहिसर, पवईतून अजगरासह सापाची सुटका
लाेकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दहिसर आणि पवई परिसरातून शनिवारी दोन सापांची सुटका करण्यात आली. एसीएफ आणि पॉज संस्थेतील सर्पमित्रांनी अजगर आणि कॅट स्नेक यांची सुखरूप सुटका केली.
दहिसर पूर्वच्या कोंकीपाडा येथील पार्किंगच्या आवारात शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमारास एका ऑटोरिक्षामध्ये अजगर असल्याची तक्रार संस्थेस प्राप्त झाली. यावेळी घटनास्थळी सर्पमित्र अक्षय बच्चे आणि प्रफुल्ल जोंधळे दाखल झाले. रिक्षाच्या मीटरला अजगर वेटोळे घालून बसला होता. त्या ७ फुटी अजगराची सुखरूप सुटका करून वन्यजीव पशुवैद्य डॉ. मनीष पिंगळे यांच्याकडे नेण्यात आले. यावेळी या अजगराच्या शरीरावर मोठ्या संख्येने रक्त शोषक कीटक आढळून आले. तब्बल एक तासाच्या प्रयत्नांनंतर हे सर्व कीटक त्याच्या शरीरावरून काढण्यात आले.
दरम्यान, पवई येथे एका दुचाकीमध्ये कॅट स्नेक हा विषारी साप असल्याची तक्रार मिळाल्यानंतर संस्थेचे नीशा कुंकू व अनिल गुप्ता हे सर्पमित्र तेथे दाखल झाले व या सापाची सुखरूप सुटका केली. त्याला पशुवैद्य डॉ. राहुल मेश्राम यांच्याकडे तपासणीसाठी नेण्यात आले.
वन विभागाला कळविल्यानंतर व पशुवैद्यांच्या सल्ल्यानुसार दाेघांनाही निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यात आल्याची माहिती एसीएफ आणि पॉज संस्थेचे संस्थापक आणि मानद वन्यजीव वॉर्डन सुनीश सुब्रमण्यन यांनी दिली.
.................