मुंबई - दहिसरवरून भाईंदरला अवघ्या तीन मिनिटांत सुसाट जाता येणार आहे. वाहतूककोंडीमुळे या प्रवासासाठी तब्बल ५० मिनिटांचा वेळ खर्ची पडत होता. यादरम्यान उभारण्यात येणाऱ्या लिंक रोड प्रकल्पासाठी ५३.१७४ एकर मिठागर जमीन मुंबई महापालिकेला देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
ही जमीन ९९ वर्षांच्या भाडेपट्ट्यावर १२.९ कोटी रुपयांत देण्यात आली आहे. या जमिनीवरून उभारला जाणारा दहीसर-भाईंदर लिंक रोड पश्चिम उपनगरांतील वाहतुकीसाठी महत्त्वाचा ठरणार असून, दहीसर ते मीरा-भाईंदरदरम्यान प्रवासाची वेळ मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे. दहीसर-भाईंदर लिंक रोड हा ६० मीटर रुंदीचा आणि ५ किलोमीटर लांबीचा मार्ग असणार आहे. सध्या दहीसरहून मीरा-भाईंदर जाण्यासाठी ९.७ किमीचा प्रवास करावा लागतो आणि त्यासाठी जवळपास ५० मिनिटे लागतात.
नव्या रस्त्यामुळे प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणावर वाचणार आहे. हा मार्ग कांदिवलीतील मेट्रो स्थानकाजवळून सुरू होऊन थेट उत्तन रोडपर्यंत जाणार आहे. तसेच भाईंदर पश्चिमेतील सुभाषचंद्र बोस मैदानाशी जोडला जाईल. या ५ किमीच्या भागापैकी १.५ किमी भाग मुंबई महापालिकेच्या हद्दीत येतो, तर ३.५ किमी भाग भाईंदर महापालिकेच्या हद्दीत आहे.
केंद्र सरकारने ठाणे जिल्ह्यातील ५३.१७४ एकर मिठागराची जमीन महाराष्ट्र सरकारकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. ही जमीन दहीसर ते भाईंदर लिंक रोड प्रकल्पासाठी मंजूर करण्यात आली आहे. मंजुरी मिळाल्यामुळे प्रकल्पाच्या कामाला गती मिळणार आहे. मुंबई महानगर क्षेत्रातील वाहतूक व्यवस्था आणि कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी डबल इंजिन सरकार प्रत्नशील आहे. - पीयूष गोयल, वाणिज्य आणि उद्योगमंत्री, केंद्र सरकार
जमीन फक्त प्रकल्पासाठी या जमिनीचा वापर केवळ याच प्रकल्पासाठीच केला जाणार असून, अन्य कोणत्याही प्रकल्पासाठी ती हस्तांतरित करता येणार नाही, अशी प्रमुख अट ठेवण्यात आली आहे. लार्सन अँड टुब्रो कंपनीला जुलै २०२४ मध्ये कंत्राट देण्यात आले आहे. दरम्यान, नव्या रस्त्यामुळे वसई खाडी, तिवरांची राने आणि मिठागर ओलांडून थेट भाईंदरकडे जाणारा मार्ग उपलब्ध होईल.