Join us

दहिसर, मुलुंड जम्बो कोविड सेंटरमध्ये ३७ कोटींचा गैरव्यवहार; कंत्राटदार कंपनीसह पालिका अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2024 09:57 IST

दहिसर व मुलुंड येथे उभारण्यात आलेल्या जम्बो कोविड सेंटरमध्ये ३७ कोटींचा गैरव्यहाराप्रकरणी ताडदेव पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

मुंबई : दहिसर व मुलुंड येथे उभारण्यात आलेल्या जम्बो कोविड सेंटरमध्ये ३७ कोटींचा गैरव्यहाराप्रकरणी ताडदेव पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. बनावट कागदपत्र व खोटी माहितीच्या आधारे हा गैरव्यवहार करण्यात आला असून, याप्रकरणी कंत्राटदार ओक्स मॅनेजमेंट कन्सल्टन्सी प्रा. लि.चे राहुल गोम्स व महापालिकेच्या तत्कालीन अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल गोम्स हे आदित्य ठाकरे यांचे मित्र असल्याचे समजते. आर्थिक गुन्हे शाखा पुढील तपास करत आहे. 

आर्थिक गुन्हे शाखेच्या सहायक पोलिस निरीक्षक शिल्पा ठेंगे यांनी स्वतः याप्रकरणी तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार दि.  १ ऑक्टोबर २०२० ते १ ऑगस्ट २०२२ यादरम्यान हा गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. कंत्राटदार मे ओक्स मॅजमेंट कन्सलटन्सी प्रा. लि.चे संचालक राहुल गोम्स यांनी दहीसर व मुलुंड येथील जम्बो कोविड सेंटरची उभारणी केली. ते मुंबई महापालिकेला हस्तांतरित केल्यानंतर भाडे मागणीकरिता अप्रामाणिकपणे खोटी माहिती व बिले पालिकेकडे सादर केली. पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी  कंत्राटदार व व्हेंडर्स यांच्यासोबत कट रचून हा संपूर्ण गैरव्यवहार घडवून आणला. त्यात अधिकाऱ्यांनी अधिकाराचा दुरुपयोग करून जाणीवपूर्वक ही खोटी बिले मंजूर केली. त्या बदल्यात कंत्राटदाराला ३७ कोटी रुपयांचा फायदा मिळाला. त्यामुळे सरकारचे नुकसान झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी कट रचणे, बनावट कागदपत्र तयार करणे, त्यांचा गैरवापर, फसवणूक अशा विविध कलमांतर्गत कंत्राटदार मे. ओक्स मॅजमेंट कन्सलटन्सी प्रा.लि.चे संचालक राहुल गोम्स व त्यांचे वेंडर्स, मुंबई पालिकेचे तत्कालीन संबंधित अधिकारी यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे.

ईडीनेही केली होती कारवाई- 

राहुल गोम्स यांना मिळालेल्या कंत्राटाबाबतही सक्तवसुली संचलनालयाने ( ईडी) पडताळणी केली होती. गोम्स यांच्या कंपनीला कोविड फील्ड रुग्णालयांमध्ये खाटा, पंखे, तंबू आणि इतर सुविधा पुरविल्या होत्या. त्याबाबत गैरव्यवहार झाल्याची माहिती ईडीला मिळाल्यानंतर त्यांनी याबाबतचे पुरावे मुंबई पोलिसांना दिले होते. त्या पुराव्यांच्या आधारावर चौकशीला सुरुवात केली होती.

तपासणीत काय? 

महापालिकेने मुलुंड कोविड केंद्रासाठी १८ महिन्यांचे व दहिसर कोविड केंद्रासाठी २१ महिन्यांचे भाडे कंत्राटदाराला दिले आहेत. तपासणीत महापालिकेने कंत्राटदार राहुल गोम्स यांना एकूण १२८ कोटी ७७ लाख १३ हजार रुपये दिली आहे. या संपूर्ण व्यवहाराची तपासणी सुरू असून, भविष्यात या गैरव्यवहाराची रक्कमही वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

टॅग्स :मुंबई पोलीसधोकेबाजी