Join us  

उत्तर मुंबईतील मागाठाणेचा दहीहंडी उत्सव रद्ध ; पूरग्रस्तांना देणार निधी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2019 7:38 PM

सामाजिक बांधिलकी जपत उत्तर मुंबईतील मागाठाणेचा दहीहंडी उत्सव रद्ध करण्यात आला असून त्यासाठी खर्च करण्यात येणारी रक्कम पूरग्रस्तांना देण्यात येणार आहे.

मनोहर कुंभेजकरमुंबई- सांगली,कोल्हापूर व तळकोकणात अलिकडेच झालेल्या अतिवृष्टीमुळे याभागाचे सुमारे 15000 कोटींचे मोठे आर्थिक नुकसान झाले.तर सुमारे 4.5लाख नागरिक बेघर झाले.त्यामुळे सामाजिक बांधिलकी राखत मोठ्या प्रमाणात राजकीय पक्ष,राज्यातील मोठी देवस्थाने, अनेक अशासकीय संस्था पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी पुढे आल्या आहेत.तर आता यंदा मुंबई,ठाणे आणि अन्य भागातील दहीहंडी उत्सव रद्ध करून त्यासाठी खर्च होणारी रक्कम पूरग्रस्तांना मदत म्हणून देण्यासाठी आता अनेक दहीहंडी उत्सव मंडळे सरसावली आहेत.

गेली 13 वर्षे उत्तर मुंबईत साजरा होणारा शिवसेनेचे मागाठाणेचे आमदार प्रकाश सुर्वे यांचा दहीहंडी उत्सव प्रसिद्ध आहे. त्यांचा दहीहंडी उत्सव रद्ध करण्याचा निर्णय घेतला आहे.दरवर्षी बोरिवली पूर्व देवीपाडा येथे आमदार सुर्वे मोठ्या प्रमाणात दहीहंडी उत्सव आयोजित करतात. तर आकर्षक बक्षिसे व हंडीचे थर फोडणाऱ्या मंडळांना चषक व रोख रक्कम देऊन गौरविण्यात येते.त्यामुळे येथील दहीहंडी फोडण्यासाठी  दहीहंडीचा थरार पाहायला मिळतो,तर अनेक प्रसिद्ध मराठी व हिंदी कलाकार गाण्यावर ठेका धरत येथे आवर्जून हजेरी लावतात.येथील दहीहंडी उत्सवातून प्लॅस्टिक बंदीचे पालन करा,तंबाकूजन्य पदार्थांचे सेवन करू नका, वृक्षारोपण करा,पर्यावरणाचे रक्षण करा असे वेगवेगळे विषय घेऊन समाज प्रबोधन केले जाते.

याबाबत आमदार प्रकाश सुर्वे यांनी लोकमतशी बोलतांना सांगितले की,सांगली,कोल्हापूर व तळकोकणात अलिकडेच झालेल्या अतिवृष्टीमुळे याभागाचे सुमारे 15000 कोटींचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे तर 4.5 लाख नागरिक बेघर झाले आहे.त्यामुळे सामाजिक बांधिलकी जपत त्यांचे संसार उभे करणे हे आद्य कर्तव्य समजून आम्ही यंदाचा दहीहंडी उत्सव रद्ध केला आहे.दहीहंडीचा निधी आम्ही शिवसेना पूरग्रस्त सहाय्यता निधीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द करणार आहे.

टॅग्स :दही हंडीशिवसेनासांगली पूरकोल्हापूर पूर