मुंबईतला दहीहंडीचा उत्सव : सण की सत्तेचा खेळ ?
By दीपक भातुसे | Updated: August 11, 2025 10:52 IST2025-08-11T10:52:14+5:302025-08-11T10:52:25+5:30
दहीहंडी उत्सवाचे स्वरूप गेल्या काही वर्षात झपाट्याने बदलले आहे.

मुंबईतला दहीहंडीचा उत्सव : सण की सत्तेचा खेळ ?
दीपक भातुसे
विशेष प्रतिनिधी
दहीहंडी उत्सवाचे स्वरूप गेल्या काही वर्षात झपाट्याने बदलले आहे. राजकीय पक्षांच्या नेत्यांनी दहीहंडी उत्सवाकडे एक संधी म्हणून पाहिले आणि या उत्सवाचे स्वरूपच बदलले. या उत्सवातील पारंपरिकपणा, पावित्र्य हरपले. हा सण मुंबईत पूर्वी अत्यंत साधेपणाने साजरा केला जायचा. चाळीतील मंडळाचे तरुण एकत्र येऊन गोविंदा पथक स्थापन करायचे. गोपाळकालाच्या दिवशी मुंबईत दहीहंड्या फोडण्यासाठी हे पथक एखादा ट्रक भाड्याने घ्यायचे. सकाळी लवकर उठून पहिल्यांदा आपल्या चाळीतील दहीहंडी फोडली जायची आणि पथक रवाना व्हायचे ते इतर भागांतील दहीहंड्या फोडण्यासाठी.
चाळी, गणेशोत्सव मंडळे अथवा व्यापारी मंडळांमार्फत मुंबईत ठिकठिकाणी दहीहंड्या बांधलेल्या असायच्या. साधारणतः ५ ते ६ थरांपर्यंतच्या या दहीहंड्या असायच्या. दहीहंडी फोडणाऱ्याला ३ ते ५ हजार रुपयांपर्यंत बक्षीस दिले जायचे. त्यावर पथक खुश असायचे. पैसे कमावणे हा उत्सवात सहभागी होण्याचा उद्देश नव्हता. कालांतराने राजकारण्यांना या गर्दीत संधी दिसू लागली. मग मोठमोठ्या दहीहंड्यांचे आयोजन सुरू झाले. राजकारण्यांनी दहीहंडीचा 'इव्हेंट' बनवला. या सणाचा वापर स्वार्थासाठी करण्यास सुरुवात झाली. यामुळे सणाची सांस्कृतिक ओळख ढासळून दिखाऊपणाचा आणि सत्तास्पर्धेचा खेळ सुरू झाला. पथकांना आकर्षित करण्यासाठी लाखोंची बक्षिसे जाहीर होऊ लागली. दरवर्षी त्यांचा आकडा वाढतोच आहे. त्यामुळे आता दहीहंडी फोडण्यासाठी जशी स्पर्धा असते, तशी कोण जास्त बक्षीस लावतो, कोण जोरदार इव्हेंट करतो, यासाठी राजकीय नेत्यांची स्पर्धा लागलेली दिसते.
दहीहंडीचे बक्षीसे, इव्हेंटवर होणारा कोट्यवधी रुपयांचा खर्च वसूल करण्यासाठी प्रायोजक निवडले जातात. आपली 'पॉवर' वापरून राजकारणी हे प्रायोजकत्व सहज मिळवतात. उत्सवाच्या आयोजनातून स्वतःचे राजकीय वजन वाढवले जाते, विभागातील तरुणांना आयोजनात गुंतवून हक्काचे कार्यकर्ते तयार केले जातात. जनसंपर्क वाढवून मतदारांवर प्रभाव टाकता येतो आणि या इव्हेंटचे थेट प्रक्षेपण होत असल्याने प्रसिद्धी मिळते ती वेगळीच. मोठी बक्षीसे घोषणा, महागडे स्टेज, प्रसिद्ध गायकांचे कार्यक्रम, रंगीबेरंगी लाइट्स आणि प्रचंड जाहिराती, पक्षांचे झेंडे, नेत्यांचे प्रचंड कटआउट्स, घोषणाबाजी यामुळे सांस्कृतिक सणाचा राजकीय प्रचारसभेत होणारा बदल स्पष्ट जाणवतो. हल्ली दहीहंडीच्या स्टेजवर नृत्यांगना बोलावून अश्लील हावभावाची नृत्य सादर होऊ लागली आहेत.
आकर्षक आयोजन, ८ ते ९ थर मानवी मनोरे उभे करण्याची जीवघेणी स्पर्धा, त्यासाठी एक महिना आधी सराव, उत्सवात राजकारण्यांची उपस्थिती याला नको तितके महत्त्व आले आहे. मात्र, दहीहंडी फोडण्याच्या प्रयत्नात अनेक गोविंदा जखमी होतात, काहींना अपंगत्वही येते, काहींचा मृत्यूही ओढवतो. मात्र, त्याकडे लक्ष द्यायला वेळ कुणाला?
या विद्रुपीकरणाचा परिणाम म्हणजे सणाशी जोडलेली सामाजिक एकजूट आणि भक्तिभाव कमी होत चालला आहे. तरुणाईला संघटित करून समाजकार्यात गुंतवण्याऐवजी केवळ स्टेजवरील नाच-गाण्यात आणि बक्षिसांच्या हव्यासात ओढले जाते. खऱ्या अर्थाने दहीहंडीचा उद्देश एकता, संघभावना आणि श्रमाचे महत्त्व हरवत आहे.