Join us

आकर्षक रंगीबेरंगी हंड्यांनी सजला बाजार, धारावी कुंभारवाड्यामध्ये खरेदी-विक्रीसाठी लगबग  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2024 09:55 IST

सध्या मुंबईत दहीहंडीची जोरदार तयारी सुरू आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : गोपाळकाला सण अवघ्या चार दिवसांवर आला आहे. श्रीकृष्ण आणि त्याचे सवंगडी माठ फोडून त्यातील दही खात असत. त्याचेच प्रतीक म्हणून गोपाळकाल्याला थरांवर थर रचून दहीहंडी फोडली जाते. या सणाच्या निमित्ताने विविध रंगांनी रंगवलेल्या आकर्षक हंड्या धारावी येथील कुंभारवाड्यात विक्रीसाठी आल्या असून, त्या खरेदीसाठी गर्दी होऊ लागली आहे. 

सध्या मुंबईतदहीहंडीची जोरदार तयारी सुरू आहे. गेल्या महिनाभर मुंबईतील विविध भागांमध्ये दहीहंडी फोडण्याचा बालगोपाळ करताना दिसत आहेत. तर, दुसरीकडे धारावी परिसरातील गुजराती कुंभारवाड्यात बनवण्यात आलेल्या मातीच्या हंड्या मुंबईतील सर्व बाजारापेठांत विक्रीसाठी पाठवण्यात आल्या आहेत. 

गोपाळकाल्याच्या तीन महिने आधीपासून येथे हंडी बनवण्याची सुरुवात होते. सुमारे १०० ते १५० कुटुंबांकडून हंड्या बनवून त्याची विक्री केली जाते. या व्यवसायासाठी कुटुंबातील सर्व सदस्य मदत करतात. सणांच्या माध्यमातून येथील कारागीरांना मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळात आहे. 

अशी बनवली जाते हंडी-

मुंबई बाहेरून माती आणून हंडी बनवली जाते. त्यानंतर ती भट्टीत भाजली जाते. हंडीला रंगरंगोटी, सुंदर नक्षीकाम तसेच लेस, टिकली, आरसे, गोंडे  लावून आकर्षक सजावट केली जाते. सजावट केलेल्या या हंड्या सध्या लक्ष वेधून घेत आहेत. 

६० ते ५०० रुपये दर-

१) साध्या लाल रंगाची हंडी, सजावट केलेल्या अशा विविध प्रकारच्या आणि आकाराच्या हंड्यांची येथे विक्री उपलब्ध आहेत. आकार आणि सजावटीनुसार येथे ६० ते ५०० रुपयांपर्यंतच्या हंड्या उपलब्ध आहेत. 

२) लहान सोसायट्यांमध्ये दहीहंडी फोडण्यासाठी साध्या लाल रंगाच्या हंडीची, तर मोठ्या मंडळांच्या सदस्यांकडून सजावट केलेल्या मोठ्या आकाराच्या हंड्यांची खरेदी केली जाते.

३) कुंभारवाड्यामध्ये दिव्या राठोड यांचा विविध सणांसाठी लागणाऱ्या मातीच्या वस्तू बनवण्याचा व्यवसाय आहे. त्यांचे कुटुंब हे काम गेले ५० ते ६० वर्षे करीत आहेत. त्यासाठी त्यांचे सर्व कुटुंब याकामी राबत असते. हंडी बनवण्यासाठी घरातील पुरुष मदत करतात, तर हंडी सजावटीसाठी स्त्रियांकडून विशेष लक्ष दिले जाते. दहीहंडीच्या दिवसांत एक हजार ते बाराशे हंड्या विकल्या जातात. - दिव्या राठोड, कुंभारवाडा, धारावी.

टॅग्स :मुंबईदहीहंडीधारावी