मुंबई : मुंबईचे मध्यवर्ती ठिकाण असल्याने गजबजलेल्या दादर विभागात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी महापालिकेचे अनेक प्रयत्न सुरू आहेत. यासाठी पेट्रोल पंप, बेकरी, ज्वेलरी आदी दुकानांतील कर्मचाऱ्यांची नियमित चाचणी करण्यात आली. तसेच त्वरित निदान होत असल्याने अखेर दादरमध्ये मंगळवारी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर पहिल्यांदाच मंगळवारी एकही बाधित रुग्ण आढळून आलेला नाही.जी उत्तर विभागातील दादर, माहीम, धारावी भागांमध्ये कोरोनाचा प्रसार नियंत्रणात आणण्यात पालिकेला यश आले आहे. मुख्य बाजारपेठ असलेल्या दादर परिसरात लोकांची वर्दळ अधिक प्रमाणात असते. त्यामुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान या भागातील बाधित रुग्णांचा आकडा वाढला होता. सावधगिरीची उपाययोजना म्हणून पालिकेने या विभागांमध्ये कोरोना चाचण्यांची मोहीम सुरू ठेवली. यासाठी विशेष चाचणी शिबिरेही आयोजित करण्यात आली.परिणामी, मंगळवारी दादरमध्ये एकही बाधित रुग्ण आढळून आला नाही. तर धारावीत दोन आणि माहीममध्ये पाच रुग्ण पॉझिटिव्ह होते. या आधी २७ आणि ३१ जानेवारीला दादरमध्ये एकही बाधित रुग्ण सापडला नव्हता. सध्या दादरमध्ये ११६, माहीममध्ये ७४ आणि धारावीत २३ सक्रिय रुग्ण उपचार घेत आहेत.
एकूण रुग्ण सक्रिय डिस्चार्जधारावी ६९०५ २३ ६५२३दादर ९७०१ ११६ ९४०१माहीम १००३४ ७४ ९७५८