मुंबईतील दादरच्या कबुतरखान्यावरील पालिकेने घातलेल्या ताडपत्र्यांवरून आज मोठा राडा झाला आहे. जैन समाजाच्या आंदोलकांकडून कबुतरखान्यावरील ताडपत्र्या आणि बांबू काढून टाकण्यात आले आहेत. यावेळी पोलिसांसोबत झटापटही झाली आहे.
उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य सरकारने मुंबईतील कबुतरखाने हटवण्याचे निर्देश महापालिकेला दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर दादर पश्चिमेतील कबुतरखाना लवकरात लवकर पूर्णपणे हटवावा, अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून जोर धरत होती. कबुतरांच्या विष्ठेमुळे श्वसन आणि फुफ्फुसांचे आजार पसरत असल्याने दादर येथील रहिवासी त्रस्त आहेत.
कबुतरांची विष्ठा आणि पिसांमुळे आरोग्यास गंभीर धोका निर्माण होत असल्याने, शहरातील कबुतरखाना बंद करण्याचे निर्देश राज्य सरकारने पालिकेला दिले होते. त्यानंतर, मुंबई उच्च न्यायालयाकडूनही महापालिकेला कबुतरखान्यांवर कारवाईचे आदेश देण्यात आले. त्यानुसार, यापूर्वीच बंद करण्यात आलेला दादारचा कबुतरखाना पूर्णपणे तोडण्यासाठी शुक्रवारी रात्री महापालिकेचे एक पथक गेले होते. मात्र, यावेळी स्थानिक लोकांनी अचानक एकत्र येत त्यांना विरोध केला. या जमावाने हा रस्ताच अडवून धरला. त्यामुळे पालिकेच्या पथकाला तोडकामाची कारवाई करता आली नाही. शनिवारी रात्री मात्र ही कारवाई पूर्ण करण्यात आली. शनिवारी संध्याकाळपासून महापालिकेने ताडपत्री लावून संपूर्ण कबुतरखाना बंद केला होता.
याविरोधात आज आंदोलक एकत्र आले होते, त्यांनी ताडपत्री आणि बांबूने झाकलेला दादरचा कबुतरखाना पुन्हा उघडा केला आहे. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता. आंदोलकांनी तिथे कबुतरांसाठी धान्य टाकले आहे, यामुळे पुन्हा तिथे कबुतरे जमण्यास सुरुवात झाली आहे.