Join us  

बापरे! बोरीवली - वेंगुर्ले तिकीट ३,३०० रूपये; एसटी प्रवाशांचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2020 2:16 AM

प्रासंगिक करारावर आरक्षित दर जास्त

कुलदीप घायवट 

मुंबई : लॉकडाऊन काळात नॉन रेड झोनमध्ये एसटीची जिल्हांतर्गत सेवा सुरु आहे. राज्यांतर्गत एसटीचा प्रवास प्रासंगिक करारानुसार केला जात आहे. मात्र यासाठी चौपट भाडे आकारले जात आहे. वेंगुर्ले ते बोरीवली ते वेंगुर्ले प्रवासासाठी साधारण ७०० ते ८०० रुपयांत प्रवास होत होता. मात्र दरडोई ३ हजार ३०० रुपये भाडे आकारले जात असल्याची तक्रार प्रवाशांनी केली. 

प्रासंगिक करारावर परतीच्या प्रवासाचे भाडे आकारले जाते. एक किमीमागे ५६ रुपये महामंडळ आकारत आहेत. वेंगुर्ले ते बोरीवली ५४० किमीच्या प्रवासासाठी ३० हजार २४० रुपये एका फेरीचे भाडे होते. मात्र प्रासंगिक करारानुसार परतीच्या प्रवासाचे भाडे प्रवाशांकडून घेतले जाते. एका किमीमागे ५६ रुपये एसटी महामंडळ आकारत आहे.लॉकडाऊनपूर्वी वेंगुर्ले ते बोरिवली ते वेंगुर्ले प्रवासासाठी साधारण ७०० ते ८०० रुपयांत प्रवास होत होता. आता २२ प्रवासी घेऊन एसटी धावणार आहे. मात्र या प्रवासाचे परतीचे भाडे आकारले तरी, १ हजार ६०० होतात. त्यामुळे एसटीने चौपट भाडे आकारले जाऊ नये. गणेशोत्सव काही दिवसात येत असल्याने प्रवाशांसाठी कमी दराच्या आणि मुबलक एसटी बस एसटी महामंडळाने पुरविल्या पाहिजेत, अशी मागणी गणेशभक्त कोकणवासीय प्रवासी संघाचे कार्याध्यक्ष दीपक चव्हाण यांनी केली.  राज्य सरकारच्या नियमानुसार बसमधील प्रवासी संख्या २२ असणार आहे. प्रवासात आधार कार्ड, वैद्यकीय प्रमाणपत्र सोबत असणे आवश्यक आहे. तिकिट दर वेंगुर्ल ते बोरीवली ३ हजार ३०० रुपये असे आहे, अशी माहिती वेंगुर्लेचे आगार प्रमुख एन. डी. वारंग यांनी दिली. 

टॅग्स :एसटी