उपप्राचार्याला ५० हजारांची लाच स्वीकारताना अटक
By Admin | Updated: March 13, 2015 22:46 IST2015-03-13T22:46:57+5:302015-03-13T22:46:57+5:30
सहाय्यक शिक्षक पदावर नियुक्ती देण्याकरिता ११ लाख २० हजार रुपयांची मागणी करून पहिल्या हप्त्यांत १ लाख २० रुपये घेवून, पुढील हप्त्याची ५० हजार रुपयांची

उपप्राचार्याला ५० हजारांची लाच स्वीकारताना अटक
अलिबाग : सहाय्यक शिक्षक पदावर नियुक्ती देण्याकरिता ११ लाख २० हजार रुपयांची मागणी करून पहिल्या हप्त्यांत १ लाख २० रुपये घेवून, पुढील हप्त्याची ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना, माणगाव येथील अशोकदादा साबळे महाविद्यालयाचे उपप्राचार्य तानाजी ज्योतीराम ढमाल यास शुक्रवारी सापळा रचून रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सुनील कलगुटकर यांच्या पथकाने रंगेहाथ अटक केली.
सातारा जिल्ह्यातील फलटण येथील रहिवासी असणारे ढमाल हे या कनिष्ठ महाविद्यालयात उपप्राचार्य पदावर कार्यरत आहेत. याच कनिष्ठ महाविद्यालयातील सहाय्यक शिक्षक या पदाकरिता एका उमेदवाराची निवड करण्यात आली होती. त्याला या पदावरील नियुक्ती देण्याकरिता ढमाल यांनी तब्बल ११ लाख २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्यापैकी १ लाख २० हजार रुपये त्या उमेदवाराने पहिल्या टप्प्यात उपप्राचार्य ढमाल यांना दिले, मात्र त्यांनी संपूर्ण लाचेच्या रकमेचीच मागणी केली.
अखेर त्या उमेदवाराने रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या येथील कार्यालयात गुरुवारी तक्रार केली. त्यावरून महाविद्यालयातच सापळा लावला. ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना ढमाल यास अटक केली. दरम्यान, उपप्राचार्य ढमाल यांची घरझडती व अन्य तपास सध्या सुरु असून, माणगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.