दाभोळ तलाठी सजात नोंदीचा घोटाळा
By Admin | Updated: July 17, 2015 22:30 IST2015-07-17T22:30:28+5:302015-07-17T22:30:28+5:30
महाड तालुक्यातील दाभोळ सजेतील गेले तीन महिने गायब असणारे तलाठी चंद्रकांत सावंत यांचा बोगस कारभार उघडकीस आला असून त्यांच्या सजेतील वारसनोंदी, खरेदी खत नोंदी,

दाभोळ तलाठी सजात नोंदीचा घोटाळा
दासगांव : महाड तालुक्यातील दाभोळ सजेतील गेले तीन महिने गायब असणारे तलाठी चंद्रकांत सावंत यांचा बोगस कारभार उघडकीस आला असून त्यांच्या सजेतील वारसनोंदी, खरेदी खत नोंदी, बँक बोजा कमी करणे, ३२ ग. प्रकरण, ४३ सेक्शन अशा २५८ नोंदी बोगस असल्याचे उघडकीस आले आहे.
चंद्रकांत सावंत महाड तालुक्यातील महाड शहर व दाभोळ या दोन सजांमध्ये गेली पाच वर्षे कामकाज पाहत होते. अचानक गेले तीन महिने कामावर न येता गायब झाले. या कालावधीत त्यांनी महाड तहसील कार्यालयाशी संपर्क साधला नाही. अनेक वेळा कार्यालयाकडून त्यांना कामावर हजर होण्याबाबत नोटिसीही देण्यात आल्या. तलाठी सावंत यांची बदली फेब्रुवारीमध्ये पळचील पोलादपूर येथे करण्यात आली होती. दाभोळ या सजाचा रीतसर चार्ज १ मार्च रोजी दुसरे तलाठी उमेश भोरे यांना देण्यात आला. तलाठी सावंत यांनी उमेश भोरे या तलाठ्याकडे दाभोळ सजाचा चार्ज देणे अपेक्षित होते. मात्र तलाठी सावंत यांनी टाळाटाळ करत चार्ज न देता ६ एप्रिलपासून ते गायब झाले. लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी तहसीलदारांच्या आदेशानुसार तलाठी उमेश भोरे यांनी दाभोळ तलाठी कार्यालयाचे कामकाज पाहण्यास सुरुवात केली. महाड प्रांत कार्यालयाकडून तलाठी सावंत यांना निलंबनाचे आदेश काढण्यात आले.
नवीन तलाठी उमेश भोरे यांना कार्यालयात फेरफार नोंदणी रजिस्टर नसल्याचे लक्षात येताच त्यांनी तहसील कार्यालयात तक्रार केली. मंडळ अधिकारी एस. बी. माने यांनी दाभोळ सजाचे दप्तर रीतसर पंचनामा करून २६ जूनला ताब्यात घेत तलाठी भोरे यांच्याकडे दिले. भोरे यांनी सर्व दप्तराची पाहणी केली असता वारसा नोंद, खरेदी खत नोंद, बँक बोजा, ३२ ग, ४३ सेक्शन नोंदी करण्याचे तीन रजिस्टर गायब असल्याचे उघडकीस आले. हे तीन रजिस्टर २०११ नंतरच्या नोंदीचे होते.
आजच्या घडीला अनेक लोकांची दाभोळ सजातील सातबारावर नावे आहेत, परंतु फेरफार नोंद झालेली नाही. यामुळे ज्या २५८ लोकांना सातबारा देण्यात आले आहे तेही सावंत यांनी बोगस दिल्याचे उघडकीस आले. तलाठी सावंत यांच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे तहसीलदार कदम यांनी सांगितले. सावंत यांच्याकडून गेली २२ वर्षे काही घोळ झाला नव्हता. त्यांना प्रवृत्त करण्यासाठी या मागे कोणी सूत्रधार आहे का? याचीही सखोल चौकशी होणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. (वार्ताहर)
तलाठी चंद्रकांत सावंत यांच्याकडून ज्या फेरफार नोंदी मंजूर न होता मंजूर आहेत, असे समजून सातबारा सोडण्यात आले होते, अशा सर्व नोंदी प्रमाणित मंडळ अधिकाऱ्यांनी केल्या नसल्याने या नोंदी ग्राह्य धरण्यात येऊ नये, अशा सूचना तलाठी व मंडळ अधिकारी यांना दिल्या आहेत. तलाठी सावंत यांना प्रांत कार्यालयाकडून निलंबित केले आहे. त्यांच्यावर काही दिवसांतच गुन्हा दाखल करण्यात
येईल.
- संदीप कदम, तहसीलदार, महाड