शिवसेना उपशाखाप्रमुखाच्या दबंगगिरीला चाप

By Admin | Updated: June 23, 2015 01:17 IST2015-06-23T01:17:14+5:302015-06-23T01:17:14+5:30

विक्रोळी टागोर नगर येथील मोक्याचा मोकळा भूखंड हडप करण्याच्या प्रयत्नात असलेल्या शिवसेनेच्या स्थानिक उपशाखाप्रमुखाने रातोरात दोन ते तीन घरे

Dabanggiri Arc of Shiv Sena | शिवसेना उपशाखाप्रमुखाच्या दबंगगिरीला चाप

शिवसेना उपशाखाप्रमुखाच्या दबंगगिरीला चाप

मुंबई : विक्रोळी टागोर नगर येथील मोक्याचा मोकळा भूखंड हडप करण्याच्या प्रयत्नात असलेल्या शिवसेनेच्या स्थानिक उपशाखाप्रमुखाने रातोरात दोन ते तीन घरे उभारण्याचा प्रताप केल्याचा आरोप रहिवाशांनी केला. याबाबत ‘लोकमत’मध्ये वाचा फोडताच याची दखल घेत महापालिका प्रशासनाने तोडक कारवाईची नोटीस पाठवली आहे. पोलीस बंदोबस्त मिळाल्यानंतर येथील अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त करण्यात येणार आहे.
विक्रोळी टागोर नगर ग्रुप क्रमांक ४ येथे प्रिन्स चाळ परिसरालगत गेल्या चाळीस वर्षांपासून रहिवासी वास्तव्यास आहेत. रेल्वेच्या ५ आणि ६ क्रमांकाच्या रुळाच्या कामासाठी बाधित ठरणाऱ्या काही झोपड्या निष्कासित करत त्यांचे पुनर्वसन करण्यात आले. अशात अनेक वर्षे येथील एक भूखंड मोकळा होता. भूखंडाला लागून स्थानिकांचे सार्वजनिक शौचालय आहे.
या भूखंडाचा वापर स्थानिक रहिवासी विविध सण, समारंभासाठी करत होते. मोक्याच्या ठिकाणी असलेला हा भूखंड लाटण्यासाठी शिवसेनेचा स्थानिक उपशाखाप्रमुख महेंद्र कदम यांनी नागरिकांना दमदाटी करून मागील आठवड्यात रातोरात दोन ते तीन पक्की घरे उभारली. रात्री-अपरात्री या ठिकाणी दारुड्यांची चंगळ असते. त्यात या घरांमुळे नागरिकांची शौचालयाकडे जाणारी वाट तोकडी झाली. मात्र यामध्ये आपला काहीही सहभाग नसल्याचे कदम यांनी सांगितले.
याबाबत ‘लोकमत’च्या १७ जूनच्या अंकात वाचा फोडण्यात आली. याची दखल घेत पालिका प्रशासनाने येथील अनधिकृत बांधकाम तोडण्याची नोटिस धाडली. याबाबत स्थानिक पोलीस ठाण्याकडे बंदोबस्तही मागण्यात आला आहे. बंदोबस्त मिळाल्यानंतर येथील अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात येणार असल्याची माहिती एस विभागाचे बांधकाम विभागाचे अभियंता अमित पाटील यांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Dabanggiri Arc of Shiv Sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.