‘त्या’ सिलिंडरचे गूढ कायम
By Admin | Updated: December 20, 2015 02:46 IST2015-12-20T02:46:47+5:302015-12-20T02:46:47+5:30
कांदिवली पूर्वच्या दामूनगर झोपडपट्टी परिसरात दोघांचे बळी घेणाऱ्या आणि हजारो कुटुंबांना बेघर केलेल्या आगीचे कारण अद्याप गुलदस्त्यातच आहे. सिलिंडरचा स्फोट झाल्याने ही

‘त्या’ सिलिंडरचे गूढ कायम
मुंबई : कांदिवली पूर्वच्या दामूनगर झोपडपट्टी परिसरात दोघांचे बळी घेणाऱ्या आणि हजारो कुटुंबांना बेघर केलेल्या आगीचे कारण अद्याप गुलदस्त्यातच आहे. सिलिंडरचा स्फोट झाल्याने ही आग लागल्याचे बोलले जात असले तरी बचाव पथकाला येथील अनेक घरांमध्ये प्रत्येकी तीन ते चार सिलिंडर सापडले आहेत. ज्याचे गूढ अद्याप उकलले नाही. त्याबाबतचा फॉरेन्सिक लॅबसह अग्निशमन, रिलायन्स व पीडब्लूडीकडून अद्याप अहवाल मिळाला नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
सात डिसेंबरला दोन हजारांवर झोपड्यांना लागलेल्या भीषण आगीमागे काही बिल्डरांचा हात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे त्यामागील नेमक्या कारणाचा शोध लागला पाहिजे, अशी स्थानिक रहिवाशांतून मागणी होत आहे. त्यामुळे तपास यंत्रणेवर त्याचा दबाव आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बचाव कार्यादरम्यान या परिसरात अनेकांच्या घरी तीन ते चार सिलिंडर होते, मुळात एखाद्याला एक जरी गॅस कनेक्शन घ्यायचे असेल तरी ते घेण्यासाठी संबंधित गॅस कंपनी कागदपत्रांची पडताळणी करते.
मात्र या ठिकाणच्या झोपड्यामध्ये अनेक सिलिंडर कसे हा प्रश्न उपस्थित होत आहे. या दुर्घटनेवेळी बचाव कार्यात सक्रिय असलेल्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, बहुतेक घरातून सरासरी ३ ते ५ सिलिंडर हस्तगत केले. सुमारे २०० सिलेंडर जवळच असलेल्या नाल्यात टाकले. जेणेकरून आगीच्या संपर्कातून त्यांना दूर ठेवता येईल. मात्र कोणत्या कारणास्तव या लोकांना इतक्या मोठ्या प्रमाणात सिलिंडर पुरविले गेले, याची माहिती घेत आहोत. याप्रकरणी फॉरेन्सिक, रिलायन्स, पीडब्लूडी आणि अग्निशमन दलाकडे या अहवालाबाबत विचारणा केली. मात्र तो अद्याप तयार नसल्याचे उत्तर संबंधितांकडून देण्यात आल्याचे समतानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप यादव यांनी सांगितले.