तौक्ते चक्रीवादळ : नौदलाची तलवार, कोलकत्ता, कोची जहाजे उतरली बचावकार्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:06 IST2021-05-18T04:06:54+5:302021-05-18T04:06:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : तौक्ते चक्रीवादळाने भर समुद्रात भरकटलेल्या जहाजांच्या सुटकेसाठी भारतीय नौदलाच्या युद्धनौका बचावकार्यात गुंतल्या आहेत. बाॅम्बे ...

तौक्ते चक्रीवादळ : नौदलाची तलवार, कोलकत्ता, कोची जहाजे उतरली बचावकार्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : तौक्ते चक्रीवादळाने भर समुद्रात भरकटलेल्या जहाजांच्या सुटकेसाठी भारतीय नौदलाच्या युद्धनौका बचावकार्यात गुंतल्या आहेत. बाॅम्बे हाय परिसरात दोन विविध ''बार्ज''वर अनुक्रमे २३७ आणि १३७ कर्मचारी अडकले असून, नौदलाच्या युद्धनौकांनी घटनास्थळी बचावकार्य हाती घेतले असून, आतापर्यंत ३८ लोकांची सुखरुप सुटका करण्यात यश मिळाले आहे.
बाॅम्बे हाय परिसरातील हिरा ऑईल फिल्डच्या बार्जवर २७३ लोक अडकले होते. येथून मदतीची मागणी होताच नौदलाने बचावकार्य हाती घेत आयएनएस कोची आणि आयएनएस तलवार या युद्धनौका घटनास्थळी रवाना केल्या. तर, मुंबईपासून आठ सागरी मैलांवरील गॅल कन्स्ट्रक्टर या बार्जवर १३७ लोक अडकले असून, त्यांच्या सुटकेसाठी आयएनएस कोलकत्ता ही युद्धनौका रवाना करण्यात आली आहे. तौक्ते वादळामुळे समुद्रात उंच लाटा आणि वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे बचावकार्य अवघड बनले आहे.
देशाच्या पश्चिम किनारपट्टीवर कर्नाटकच्या किनाऱ्यावर भरकटलेल्या कोरोमंडळ सपोर्टर -९ या भारतीय बोटीवरील चार खलाशांची नौदलाच्या बचाव पथकाने सुटका केली. बोटीचे इंजिन बंद पडून तांत्रिक समस्या निर्माण झाल्याने जहाजात पाणी शिरले होते. त्यानंतर नौदलाच्या हेलिकाॅप्टर्सनी जहाजावरील चार खलाशांची सुखरुप सुटका केली.
तौक्ते चक्रीवादळात आणीबाणीच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी नौदलाची ११ बचाव पथके तयार ठेवण्यात आली आहेत. तर, पूरस्थितीत तातडीची वैद्यकीय मदत आणि सुटकेसाठी १२ पथके सुसज्ज ठेवण्यात आली आहेत. तर, पायाभूत सुविधांच्या दुरुस्तीसाठी पथके तयार ठेवण्यात आल्याची माहिती नौदलाच्या जनसंपर्क विभागाने दिली आहे.