Join us  

Cyclone Tauktae: थरारक Video! आतापर्यंत समुद्रात अडकलेल्य़ा 177 कर्मचाऱ्यांची सुटका; इतरांचा शोध सुरु

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2021 9:59 AM

Cyclone Tauktae, Indian Navy rescue Operation in Arabian sea Oil fields: कोकण किनारपट्टीवर काल धडकलेल्या तौक्ते चक्रीवादळात तीन जहाजे अडकली होती. यावर ओएनजीसीसाठी काम करणारे कर्मचारी होते. समुद्रातील ऑईल फिल्डवर ओएनजीसीच्या एका प्रकल्प उभारणीचे काम सुरु होते.

Cyclone Tauktae: मुंबई : तौक्ते चक्रीवादळामुळे बाँम्बे हाय परिसरातील हिरा आँईल फिल्डमधील 'बार्ज पी-३०५' वरील 148 जणांना वाचविण्यात शोध पथकांना यश मिळाले आहे. आज सकाळी सहा वाजेपर्यंत भारतीय नौदलाच्या आयएनएस कोची आणि आयएनएस कोलकत्ता या युद्धनौकांनी एकूण १११ तर ग्रेटशिप अहिल्या आणि ओशन एनर्जी या जहाजांनी अनुक्रमे १७ आणि १८ जणांची सुटका केली. अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत हे बचावकार्य सुरू आहे. आतापर्यंत 177 जणांची सुटका करण्यात आली आहे. (At least 148 people have been rescued so far. Rescue operations are still on: ONGC)

कोकण किनारपट्टीवर काल धडकलेल्या तौक्ते चक्रीवादळात तीन जहाजे अडकली होती. यावर ओएनजीसीसाठी काम करणारे कर्मचारी होते. समुद्रातील ऑईल फिल्डवर ओएनजीसीच्या एका प्रकल्प उभारणीचे काम सुरु होते. यावरील हे कर्मचारी असल्याचे ओएनजीसीने स्पष्ट केले आहे. तसेच यापैकी 148 जणांना वाचविण्यात आल्याचे ओएनजीसीने म्हटले आहे. उर्वरित कर्मचाऱ्यांचा शोध सुरु आहे. 

तर, 'गॅल कन्स्ट्रक्टर' ही बार्ज त्यावरील १३७ जणांसह समुद्रात भरकटली आहे. सध्या कुलाब्यापासून ४८ सागरी मैलावर ही बार्ज आहे. या बार्जच्या सहाय्यासाठी तटतक्षक दलाच्या सम्राट जहाजासह वाँटर लिलि ही टोईंग बोट या परिसरात तैनातीला आहे. या बार्जवर अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेचे प्रयत्न सुरू आहेत. 

तर, सागर भुषण या तेलविहिरीवरील कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी आय एन एस तलवार घटनास्थळी रवाना झाली आहे. या तेलविहीरीवर १०१ जण अडकल्याची माहिती आहे. तर, त्यालगतच्या एस.एस ३ बार्जवर १९६ जण अडकून पडले आहेत. या दोन्ही बार्ज सध्या पिपावा बंदरापासून ५० सागरी मैलावर असल्याची माहिती नौदलाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली आहे.

सुत्रांनी लोकमतला दिलेल्या माहितीनुसार ओएनजीसीचे जहाज Sagar Bhushan चा कालच्या तौत्के चक्रीवादळात लाटांचा दबाव आल्याने नांगर तुटला होता. यामुळे हे जहाज भरकटले आहे. या जहाजावर मोबाईल फोन बंद असतात. यामुळे या जहाजाशी केवळ सॅटेलाईट फोनद्वारेच संपर्क साधता येतो. अशा परिस्थितीत जहाजावरील कर्मचाऱ्यांशी संपर्क साधणे कठीण आहे. 

काल सायंकाळपासून अरबी समुद्रात या विविध ठिकाणी नौदलाच्या पथकांनी मदतकार्याला सुरूवात केली होती. चक्रीवादळामुळे मदतकार्यामुळे अडथळे येत होते. तरीही रात्री अकरा वाजेपर्यंत बचावकार्य सुरूच होते. त्यानंतर मात्र खराब हवामानामुळे काम थांबविण्यात आले. बुधवारी सकाळपासून नौदलाच्या हेलिकाॅप्टर्सनी घटनास्थळांची हवाई पाहणी करत परिस्थितीचा अंदाज घेतला आणि बचावपथके घटनास्थळी उतरवली. आज दिवसभर बचावकार्य सुरू राहणार असून मदतकार्यात आणखी पथके उतरविण्यात येणार आहेत.

टॅग्स :तौत्के चक्रीवादळभारतीय नौदलओएनजीसी