सायकल ट्रॅक वरळीऐवजी गिरगावपर्यंत, वाहतूक पोलिसांची मंजुरी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 07:03 AM2017-12-10T07:03:54+5:302017-12-10T07:04:02+5:30

दिल्लीकरांचा श्वास घुसमटत असल्याचे उदाहरण समोर आल्यानंतर मुंबई महापालिकेने प्रदूषण रोखण्यासाठी सायकलिंगला प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली आहे.

 The cycle track is not sanctioned by traffic police, from Worli to Girgaum | सायकल ट्रॅक वरळीऐवजी गिरगावपर्यंत, वाहतूक पोलिसांची मंजुरी नाही

सायकल ट्रॅक वरळीऐवजी गिरगावपर्यंत, वाहतूक पोलिसांची मंजुरी नाही

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दिल्लीकरांचा श्वास घुसमटत असल्याचे उदाहरण समोर आल्यानंतर मुंबई महापालिकेने प्रदूषण रोखण्यासाठी सायकलिंगला प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार एअर इंडिया मुख्यालय (मरिन ड्राइव्ह) ते वरळी सी फेस अशी ११.५ कि.मी. अंतराची स्वतंत्र मार्गिका तयार केली आहे. मात्र वरळीपर्यंत तयार केलेल्या या सायकलिंग ट्रॅकला वाहतूक पोलिसांनी अद्याप मंजुरी दिलेली नाही. त्यामुळे रविवारपासून सुरू होत असलेला हा ट्रॅक आता गिरगाव चौपाटीपर्यंतच असणार आहे.
मुंबईत गाड्यांच्या संख्येबरोबरच प्रदूषणही वाढत आहे. त्यामुळे मुंबईकरांवर दिल्लीसारखी वेळ येऊ नये, यासाठी पालिकेने ‘सायकल टू वर्क’ प्रवास करण्यास प्रोत्साहन देणे सुरू केले. त्यानुसार दक्षिण मुंबईत मोफत सायकल पार्किंग सेवा गेल्या वर्षी जुलै महिन्यात पालिकेने सुरू केली. त्यानंतर आता सायकल ट्रॅक तयार केला आहे. मरिन ड्राइव्हपासून वरळी सागरी सेतूपर्यंत दर रविवारी व काही शनिवारी सकाळी ६ ते ११ या वेळेत या सायकल ट्रॅकचा लाभ सायकलप्रेमींना घेता येणार आहे.
गेल्या रविवारी या ट्रॅकचे उद््घाटन झाले. त्या वेळी जुहू चौपाटीपर्यंतच ट्रॅक तयार करण्यात आला होता. तर या रविवारी वरळी सागरी सेतूपर्यंत ट्रॅक बनवून सायकलप्रेमींना खुला करून देण्यात येणार होता. पण वाहतूक पोलिसांनी वरळीपर्यंत हा ट्रॅक बनविण्यास नकार दिला आहे. त्यामुळे या रविवारी केवळ गिरगावपर्यंतच हा ट्रॅक असणार आहे, असे महापालिकेकडून सांगण्यात आले.

असा आहे सायकल ट्रॅक
हा सायकल ट्रॅक एनसीपीए-नेताजी सुभाष मार्ग (मरिन ड्राइव्ह), बाबुलनाथ, गोपाळराव देशमुख मार्ग (पेडर रोड), अ‍ॅनी बेझंट मार्ग, खान अब्दुल गफ्फार खान मार्ग, राजीव गांधी सागरी सेतू (वरळी सी-लिंक) अशा सुमारे ११ कि. मी.च्या मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा म्हणजेच २२ कि. मी. एवढ्या अंतराचा प्रस्तावित आहे.
या सायकल ट्रॅकसाठी पायाभूत सुविधा महानगरपालिकेतर्फे तयार करण्यात आल्या आहेत. दर रविवारी व काही शनिवारी सायकल ट्रॅकचे व्यवस्थापन, संचलन व समन्वयन करण्यासाठी महापालिकेने इच्छुक उद्योग समूह, स्वयंसेवी संस्था इत्यादींकडून प्रस्ताव मागविले आहेत. निवड होणाºया संस्थेला हे काम प्रायोजित करण्याच्या अटी व शर्तींवर जाहिरात करता येणार आहे.
मुंबईकर स्वत:ची सायकल आणून या ट्रॅकवर चालवू शकतात. ज्यांच्याकडे स्वत:ची सायकल नाही, त्यांना तासाला शंभर रुपये शुल्क आकारून भाड्याने सायकल मिळणार आहे.

Web Title:  The cycle track is not sanctioned by traffic police, from Worli to Girgaum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई