Join us
Daily Top 2Weekly Top 5

सायकल ट्रॅक पडले महागात; २१ कोटींचा अतिरिक्त खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 03:32 IST

मुलुंड ते सहार रोड; एक किमीसाठी दीड कोटीचा अधिभार

मुंबई : मुंबईत तयार करण्यात येत असलेल्या सायकल ट्रॅकच्या कामात महापालिकेला सुमारे २१ कोटी रुपयांचे नुकसान होत असल्याचे उजेडात आले आहे. मुलुंड ते सहार रोड सायकल ट्रॅकच्या प्रत्येक किलोमीटरसाठी सुमारे ११ कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. मात्र, आता जलवाहिनीलगत आणखी १२ किमी लांबीचे सायकल ट्रॅक तयार करण्यात येणार आहेत. या सायकल ट्रॅकच्या प्रत्येक किमीसाठी सुमारे १० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. म्हणजेच यापूर्वी प्रत्येक किमीसाठी सुमारे दीड कोटी रुपये महापालिकेने अधिक मोजले आहेत.मुंबईतील मुख्य जलवाहिन्यांलगतच्या दोन्ही बाजूचे दहा मीटरपर्यंतचे अतिक्रमण उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार काढण्यात येत आहे. या मोकळ्या जागेवर सायकल ट्रॅक बनविण्यात येत आहे. जलवाहिनी लगतच्या मुलुंड ते सहार रोड या १४ किमी लांबीच्या सायकल ट्रॅकच्या बांधकामाचे कंत्राट दिल्यानंतर, घाटकोपर, चेंबूर, शिवडी-परळ आणि वांद्रे ते सांताक्रुझ (पूर्व) आदी भागांतील जलवाहिनीलगतच्या मोकळ्या जागांवर सायकल ट्रॅक बांधण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार, एकूण १२ किमी लांबीचे सायकल ट्रॅक आणि जॉगिंग ट्रॅक बांधण्यात येणार आहे. या सायकल ट्रॅकच्या बांधकामासाठी स्काय वे इन्फ्राप्रोजेक्ट प्रा. लि. या कंपनीची निवड करण्यात आली आहे. या कंपनीला एकूण १२० कोटींचे कंत्राट दिले असून, प्रति किमीसाठी १० कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. मात्र, मुलुंड ते सहार रोड या १४.१० किलोमीटरच्या सायकल ट्रॅकसाठी प्रति किमी साडेअकरा कोटी रुपये मोजले होते. त्या तुलनेत एन विभाग, एम पश्चिम विभाग, एफ/दक्षिण विभाग आणि एच/पूर्व विभाग आदी भागांतील १२ किमी लांबीकरिता सुमारे १२० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. यामध्ये सायकल ट्रॅकसह जॉगिंग ट्रॅक, सेवा रस्ता, वृक्षारोपण, गार्डन, संरक्षण भिंत, पर्जन्य वाहिन्या टाकणे आदींच्या कामांचा समावेश आहे.असे झाले नुकसानगेल्या वेळीस ठेकेदाराला अंदाजित रकमेपेक्षा १२ टक्के कमी दराने काम देण्यात आले होते. या वेळीस वाटाघाटी करून १.१८ टक्के कमी दराने काम करण्याची ठेकेदाराने तयारी दर्शविली आहे, परंतु १२ टक्के कमी दरात देऊनही आधीच्या पी. डी. मूव्हर्स या कंपनीला प्रति किमीसाठी दीड कोटी रुपये अधिक मोजले गेले होते.मात्र, पहिल्या टप्प्यात भांडुप कॉम्प्लेक्सचा अडीच किलोमीटर लांबीचा पट्टा आहे. या पट्ट्यात जंगलातील प्राण्यांचा धोका लक्षात घेऊन, तो परिसर पाच मीटर उंचीपर्यंत संरक्षित करण्यात येणार आहे. यामुळे पहिल्या टप्प्यातील कामाचा दर अधिक असल्याचे सूत्रांनी सांगितले.खर्चाचा तपशीलमुलुंड ते सहार रोड - १४.१० किलोमीटर (कंत्राट : १६१ कोटी रुपये), एन, एम पश्चिम, एफ/दक्षिण आणि एच/पूर्व विभाग : १२ किलोमीटर - कंत्राट रक्कम : १२० कोटी रुपये, मोकळ्या होणाऱ्या जलवाहिनीलगतची लांबी : ३६ किलोमीटर

टॅग्स :मुंबईवातावरण