लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी देशभरातील ६० कोटी ८२ लाख रुपयांच्या सायबर गुन्ह्यांचा पर्दाफाश करण्यात यश मिळवले. या प्रकरणी १२ जणांना अटक करण्यात आली आहे.
मुंबईतील गुन्हे शाखेच्या कक्ष-२ च्या अधिकाऱ्यांनी कांदिवली येथील डी. जी. सर्च कन्सलटन्सी आणि प्रिरीत लॉजिस्टीक लि. या कंपन्यांवर छापेमारी केली. या दरम्यान २ लॅपटॉप, १ प्रिंटर, २५ मोबाईल फोन, वेगवेगळ्या बँकांचे २५ पासबुक, ३० चेकबुक, ४६ एटीएम कार्ड, स्वाईप मशीन्स, वेगवेगळ्या मोबाईल कंपन्यांचे १०४ सीमकार्ड आदी मुद्देमाल जप्त केला. छापेमारी दरम्यान वैभव पाटील, सुनीलकुमार पासवान, अमनकुमार गौतम, खुशबू सुंदरजुळा, रितेश बांदेकर यांना घटनास्थळी अटक केली.
बँक खात्यांच्या तपशिलाच्या आधारे गुन्हे
टोळीने चालू खाते व बचत खात्याचे तपशील सात ते आठ हजारात विकत घेऊन त्या खात्यातील पैसे लंपास करत असल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले. या कार्यपद्धतीद्वारे या टोळीने ९४३ बँक खात्यांचा वापर केला. तर १८१ बँक खात्यातून मोठ्या प्रमाणावर पैसे लंपास केले होते. या प्रकरणी मुंबईत एकूण १४ गुन्हे दाखल झाले होते. टोळीने मुंबईतून एकूण १ कोटी ६७ लाख, उर्वरित महाराष्ट्रातून १० कोटी ५७ लाख तर देशभरातून एकूण ६० कोटी ८२ लाख रुपये लंपास करण्यात आले होते.