सायबर सिटीत स्वातंत्र्य दिन उत्साहात
By Admin | Updated: August 16, 2014 00:20 IST2014-08-16T00:20:28+5:302014-08-16T00:20:28+5:30
स्वातंत्र्यदिनानिमित्त आज शहरात ठिकठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले.

सायबर सिटीत स्वातंत्र्य दिन उत्साहात
नवी मुंबई : स्वातंत्र्यदिनानिमित्त आज शहरात ठिकठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले. विविध शाळा, महाविद्यालये, गृहनिर्माण सोसायट्या तसेच शासकीय व निमशासकीय कार्यालयात आज ध्वजारोहण करण्यात आले. यानिमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. नवी मुंबईसह पनवेल, उरण या परिसरात स्वातंत्र्य दिनाचा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.
महापालिकेच्या नूतन मुख्यालयात महापौर सागर नाईक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी महापालिका आयुक्त ए.एल.जऱ्हाड, विरोधी पक्षनेता सरोज पाटील, प्रशासन विभागाचे उपायुक्त जगन्नाथ सिन्नरकर आदी उपस्थित होते. विशेष म्हणजे आज स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून मुख्यालयाच्या आवारात अखंड फडकणाऱ्या राष्ट्रध्वजाला आज अनेकांनी सलामी दिली.
कोकण भवन आवारातील ध्वजारोहण ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कोकण क्षेत्रातील विविध पुरस्कारांचे वितरण देखील स्वातंत्र्यदिनाच्या औचित्यावर करण्यात आले.
यावेळी विभाग स्तरावरील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्रामपंचायत पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. दापोली तालुक्यातील जालगांव या ग्रामपंचायतीने हा पुरस्कार पटकावला. १० लाख रुपये व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते. तसेच माणगाव तालुक्यातील चांदोरे या गावाने द्वितीय तर डहाणू तालुक्यातील बोर्डी ग्रामपंचायतीने तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. त्यांना अनुक्रमे ८ व ६ लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. तर स्वर्गीय वसंतराव नाईक, पिण्याचे पाणी व सांडपाणी व्यवस्थापनाचा विशेष पुरस्कार पालघर येथील उमरोली गावाला देण्यात आला. त्याबरोबरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक एकता पुरस्कार रत्नागिरी जिल्ह्यातील करबुडे गावाला देण्यात आला. त्यासह इतर अनेक पुरस्कारांचा स्वीकार करण्यासाठी ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक व पदाधिकारी मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित होते. सदर कार्यक्रमास महापौर सागर नाईक, विभागीय कोकण आयुक्त राधेश्याम मोपलवार, पोलीस महानिरीक्षक (कोकण परिक्षेत्र) अमिताभ गुप्ता, नवी मुंबईचे पोलीस आयुक्त के.एल. प्रसाद, महापालिका आयुक्त आबासाहेब जऱ्हाड आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी महापालिकेच्या नव्या मुख्यालय इमारतीची पाहणी देखील केली. (प्रतिनिधी)