मुंबई - विधान भवनातील वरिष्ठ सुरक्षा अधिकारी सायबर भामट्याच्या जाळ्यात अडकल्याचे समाेर आले आहे. सायबर ठगांच्या बोगस आरटीओ चलन या एपीके फाइलवर क्लिक केल्याने त्यांना ३ लाख रुपये गमावले आहेत. याप्रकरणी ताडदेव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुरक्षा अधिकारी मुंबई पोलिस दलात कार्यरत असून, ताडदेव पोलिस लाइनमध्ये राहतात. १८ ऑगस्टच्या दुपारी साडेबारा वाजता बॅच क्रमांक १९८८ या व्हॉट्स ॲप ग्रुपवर ‘आरटीओ चलन’ ही एपीके फाइल आली. त्यामध्ये महत्त्वाची माहिती असेल, या विचाराने पोलिसाने त्या लिंकवर क्लिक केले. लगेच त्यांच्या मोबाइलवर एक ॲप डाऊनलोड झाले. त्यावर एक फॉर्म ओपन झाला. फॉर्मवर वैयक्तिक माहिती भरण्याबाबत सूचना दिली होती.
अशी झाली फसवणूकपोलिसाने नाव, मोबाइल क्रमांक, पत्ता भरून फॉर्म सबमीट केला असता, त्याच्याकडे बँक डिटेल्स मागितली गेली. संशय आल्याने बागवान यांनी बँक खात्याची माहिती न भरता ते लिंकमधून एक्झिट झाले. तसेच, त्यांनी ॲप अनइंस्टॉल केले. तोपर्यंत उशीर झाला. ठगांनी तक्रारदार पोलिसांच्या बँक खात्यांची गोपनीय माहिती मिळवत ३ लाखांवर हात साफ केला. फसवणूक झाल्याची खात्री पटताच त्यांनी १९३० हेल्पलाइनवर तक्रार दिली. त्यानंतर ताडदेव पोलिस ठाणे गाठले.