Join us

एसटीचा तोटा कमी करण्यासाठी खर्चात कपात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2019 04:59 IST

एसटी महामंडळाच्या तोट्यात दिवसागणिक वाढ होत असल्याची गंभीर दखल वित्तीय सल्लागार व मुख्य लेखा अधिकाऱ्यांनी घेतली आहे.

मुंबई : एसटी महामंडळाच्या तोट्यात दिवसागणिक वाढ होत असल्याची गंभीर दखल वित्तीय सल्लागार व मुख्य लेखा अधिकाऱ्यांनी घेतली आहे. तसेच एसटीच्या सर्व विभाग नियंत्रकांना विभागाचा चलनीय खर्च विभागाच्या प्राप्त उत्पन्नातून भागविण्याचा सल्लाही दिला आहे. या आर्थिक वर्षात नोव्हेंबर महिन्यापर्यंत एसटीचा तोटा ८२० कोटी रुपयांवर पोहोचला असून, २०१७-१८मध्ये महामंडळाला ३ हजार ६०० कोटी रुपयांचा संचित तोटा सहन करावा लागल्याचेही वित्तीय सल्लागारांनी नमूद केले आहे. परिणामी, एसटीचा एकूण संचित तोटा ४ हजार कोटींवर पोहोचल्याचे चित्र आहे.गतवर्षी एसटी महामंडळाने तिकिटाच्या दरात वाढ करत उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यानंतरही किलोमीटर व भारमान यामध्ये घट झाल्याने एसटीचे उत्पन्नही घटले. विभागीय पातळीवर खर्चात अनावश्यक वाढ झाल्याचा निष्कर्ष वित्तीय सल्लागारांनी काढला आहे. त्यामुळे विभागीय पातळीवर व्यापक मोहीम हाती घेऊन चलनीय कामगिरीत सुधारणा करण्याचा सल्ला या आदेशात दिला आहे.उत्पन्न वाढविण्याशिवाय महामंडळासमोर पर्याय नसून, अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकताही वित्तीय सल्लागारांनी व्यक्त केली आहे. ही बाब गांभीर्याने घेण्यास सांगताना त्यांनी स्थानिक पातळीवर काम होत नसल्याचे निदर्शनास आणले आहे.एसटी कर्मचारी व अधिकाºयांना पाठविलेल्या या गोपनीय पत्रातून पुन्हा एकदा एसटीचे चाक तोट्यात अडकल्याचे दिसत आहे. परिणामी, भविष्यात विभागीय पातळीवर होणाºया बदलांचा पूर्तता अहवाल वित्तीय सल्लागारांना पाठवावा लागणार आहे. त्यामुळे विभागीय नियंत्रकांसह कर्मचारी, अधिकारी कामाला लागण्याची शक्यता एका वरिष्ठ अधिकाºयाने व्यक्त केली.>‘उत्पन्न वाढविणे हाच पर्याय’विभागीय पातळीवर व्यापक मोहीम हाती घेऊन चलनीय कामगिरीत सुधारणा करण्याचा सल्ला वित्तीय सल्लागारांनी विभाग नियंत्रकांना दिला आहे. उत्पन्न वाढविल्याशिवाय महामंडळासमोर पर्याय नसून, अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.