Join us
Daily Top 2Weekly Top 5

चित्रनगरीला वाचविण्यासाठी कट अ‍ॅण्ड कव्हर बोगदा; गोरेगाव-मुलुंड जोड रस्त्याचा मार्ग मोकळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2019 06:18 IST

या प्रकल्पात काही बदल करून फिल्मसिटीच्या खालून कट अ‍ॅण्ड कव्हर बॉक्स बोगदा तयार करण्यात येणार आहे.

मुंबई : महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी गोरेगाव-मुलुंड जोडरस्त्यामुळे फिल्मसिटीचे विभाजन होण्याचा धोका निर्माण झाला होता. चित्रीकरणाच्या कामातील अडथळा आणि ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी १२०० मीटरचा कट अ‍ॅण्ड कव्हर बोगदा काढण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.

मुंबईतील वाहतूककोंडीवर उपाय म्हणून पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्गाला जोडण्यासाठी गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता बांधण्यात येणार आहे. यामध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून मुख्य बोगद्याकडे जाणारा रस्ता गोरेगावच्या चित्रनगरीमधून जाणार आहे. चित्रनगरीचे विभाजन होण्याचा धोका आहे. वाहनांच्या वर्दळीमुळे चित्रीकरणामध्ये अडथळे निर्माण होण्याचा धोका होता. हा धोका ओळखूनच प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे़ जेणेकरून वाहन चालक तसेच नागरिकांना त्रास होणार नाही़ तसेच चित्रिकरणही सुरळीत होऊ शकेल़

या प्रकल्पात काही बदल करून फिल्मसिटीच्या खालून कट अ‍ॅण्ड कव्हर बॉक्स बोगदा तयार करण्यात येणार आहे. गोरेगाव-मुलुंड लिंक रोड हा एकूण १२.२ कि.मी. आहे. यामध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात ४.७ कि.मी.चा बोगदा काढण्यात येणार आहे. तर फिल्मसिटीतून १.६ कि.मी.चा कट अ‍ॅण्ड कव्हर बोगदा काढण्यात येईल, अशी माहिती प्रशासनाने स्थायी समितीला दिली आहे.

वन्यजीव मंडळाची परवानगीया प्रकल्पासाठी राष्ट्रीय वन्यजीव मंडळाकडून वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत परवानगी मिळाली आहे. वन कायद्यांतर्गत अपेक्षित परवानगी अद्याप मिळालेली नाही.असा असेल बोगदागोरेगाव पूर्व येथील चित्रनगरीमधून मुख्य बोगद्याकडे जात असलेल्या १७०० मीटर लांबीच्या रस्त्यापैकी सुमारे १२०० मीटर लांबीच्या ३ बाय ३ मार्गिकेसह कट अ‍ॅण्ड कव्हर बॉक्स बांधण्यात येणार आहे. या बोगद्यात आपत्कालीन व्यवस्थेसाठी तीनशे मीटर अंतरावर दोन्ही बोगदे जोडण्यात येणार आहेत.

टॅग्स :महामार्गमुंबई महानगरपालिका