प्रभादेवीच्या जत्रोत्सवावर यंदा पडदा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:31 IST2021-02-05T04:31:55+5:302021-02-05T04:31:55+5:30

भाविकांना केवळ दर्शन राज चिंचणकर लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबईत देवस्थानांच्या ज्या काही जत्रा अस्तित्वात आहेत; त्यात प्रभादेवीची ...

Curtain on Prabhadevi's Jatrotsava this year! | प्रभादेवीच्या जत्रोत्सवावर यंदा पडदा!

प्रभादेवीच्या जत्रोत्सवावर यंदा पडदा!

भाविकांना केवळ दर्शन

राज चिंचणकर

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबईत देवस्थानांच्या ज्या काही जत्रा अस्तित्वात आहेत; त्यात प्रभादेवीची जत्रा महत्त्वाचे स्थान राखून आहे. काळाच्या ओघात यातील अनेक जत्रा बंद झाल्या असल्या, तरी प्रभादेवीची जत्रा मात्र नित्यनियमाने भरते. दरवर्षी शाकंभरी पौर्णिमेला सुरू होणाऱ्या या जत्रोत्सवामुळे १० दिवस प्रभादेवीचा परिसर उत्सवात रंगून जातो. यंदा मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे या जत्रोत्सवावर पडदा पडला आहे; परंतु भाविकांना देवीचे दर्शन मात्र घेता येणार आहे.

पौष महिन्यातील पौर्णिमा, अर्थात शाकंभरी पौर्णिमा आणि प्रभादेवीची जत्रा हे समीकरण अतूट आहे. या पौर्णिमेपासून दरवर्षी प्रभादेवीची जत्रा भरते आणि प्रभादेवी परिसरात उत्साह भरून वाहतो. पण यावर्षी जत्रांना अद्याप परवानगी मिळाली नसल्याने, यंदा हा जत्रोत्सव होणार नाही. यंदा गुरुवार, २८ जानेवारी रोजी शाकंभरी पौर्णिमा आहे आणि कोरोनाचे संकट नसते तर या दिवसापासून प्रभादेवीच्या जत्रोत्सवाला प्रारंभ झाला असता. यंदा जत्रा भरणार नसल्याने भाविक आणि बच्चेमंडळी या आनंदाला पारखी होणार आहेत. साहजिकच, यावर्षी प्रभादेवीचा परिसर जत्रेने दुमदुमणार नाही.

यंदा जत्रोत्सव नसला, तरी भाविकांना दर्शनासाठी प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून प्रभादेवीचे मंदिर खुले राहणार आहे. २८ जानेवारी ते ६ फेब्रुवारी या काळात प्रभादेवीच्या मंदिरात उत्सव साजरा केला जाणार आहे. या दिवसांत केवळ दर्शनासाठी सकाळी ६ ते रात्री ८.३० या वेळेत मंदिर खुले राहणार आहे. दरम्यान, दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी देवीला अर्पण करण्यासाठी कोणत्याही वस्तू आणू नयेत, असे आवाहन मंदिर प्रशासनाने केले आहे.

(सोबत : प्रभादेवीचा फोटो)

.........................

Web Title: Curtain on Prabhadevi's Jatrotsava this year!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.