Join us  

मराठीत बोलण्यास सांगितल्याने कुरियर बॉयचा महिलांवर हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2019 5:45 AM

दादरच्या न. चिं. केळकर रोड परिसरात ४८ वर्षीय सुजाता पेडणेकर या वृद्ध आई व दोन भावंडांसह राहतात.

मुंबई : मराठीत बोलण्यास सांगितल्याच्या रागात परप्रांतीय कुरियर बॉयने महिलेला शिवी देत तिच्या डोक्यात जोराचा फटका मारला. मदतीसाठी आलेल्या बहिणीच्या गालात पेन खुपसल्याचा धक्कादायक प्रकार दादरमध्ये शुक्रवारी घडला. शिवाजी पार्क पोलिसांनी कुरियर बॉय इब्राहिम सामिजुद्दिन शेख (२८) याला अटक केली.

दादरच्या न. चिं. केळकर रोड परिसरात ४८ वर्षीय सुजाता पेडणेकर या वृद्ध आई व दोन भावंडांसह राहतात. शुक्रवारी दुपारी शेख कुरियर घेऊन त्यांच्या घराशी धडकला. पेडणेकर यांनी कोणते कुरियर घेऊन आला आहे, असे विचारताच त्याने ‘समर्थ व्यायाम मंदिर का पुस्तक लेके आया हंू’ असे सांगितले. पेडणेकर यांनी त्याला मराठीत बोलण्यास सांगताच, ‘मै हिंदुस्थानी हूँ और महाराष्ट्र हिंदुस्थान मे है’ असे बोलला. मात्र मराठीत बोलण्याचा आग्रह धरताच त्याने शिवी दिली. त्यामुळे पेडणेकर यांनी बहीण विनीता (५०) यांना बोलावले. त्यांना घडलेला प्रकार सांगताच, त्यांनी कुरियर घेण्यास विरोध केला आणि शेखचा फोटो काढून तो त्याच्या मालकाला दाखविण्याची धमकी दिली. दरम्यान, या रागामुळे शेखने वाद घालून पेडणेकर यांच्या डोक्यात हाताने फटका मारला. विनीता मदतीसाठी पुढे येताच, त्याने हातातील पेन त्यांच्या गालात खुपसले. गालातून रक्त आलेले पाहून तसेच आराडाओरड ऐकून शेजारच्या महिलेने नोकराला बोलावून शेखला पकडले. 

टॅग्स :मराठीमुंबईगुन्हेगारी