Join us  

कोरोना औषधांच्या काळ्याबाजाराला लगाम

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2020 6:19 PM

दुर्मिळ औषधांची उपलब्धता वाढली, वापरही झाला नियंत्रित

मुंबई : कोरोना रुग्णांवरील उपचारांसाठी प्रभावी ठरणा-या रेमडेसिवीर आणि टोसिलीझूमँब या औषधांची मागणी आणि पुरवठा यांच्यात प्रचंड तफावत निर्माण झाल्याने जून आणि जुलै महिन्यांत त्यांचा काळाबाजार तेजीत होता. मात्र, गेल्या महिन्याभरात वाढलेली उपलब्धता, वापराबाबतची मार्गदर्शक तत्वे जाहीर करून त्यावर आणलेले नियंत्रण, पोलीस तसेच अन्न व औषध प्रशासनाने केलेली कारवाई आदी अनेक कारणांमुळे या औषधांच्या काळ्याबाजाराला लगाम लागला आहे.

गंभीर आणि अतिगंभीर रुग्णांवर रेडेसिवीर आणि टोसिलीझूमँब या औषधांची मात्रा लागू पडत असल्याचे लक्षात आल्यानंतर जून महिन्यात त्यांचा अनिर्बंध वापर सुरू झाला होता. ही औषधे कोणत्या रुग्णाला, कधी आणि किती प्रमाणात द्यायची याबाबत एकवाक्यता नव्हती. औषधांची उपलब्धता अत्यंत मर्यादीत प्रमाणात होती. औषध विक्रेत्यांकडे ती उपलब्ध होत नसतानाही डाँक्टर सर्सार चिठ्ठी लिहून देत हहोते. मागणी आणि पुरवठ्यात तफावत असल्याने औषधे मिळवताना रुग्णांचे नातेवाईक अक्षरशः रडकूंडीला येत होते. ३१,५०० रुपये किंमत असलेली टोसिलीझूमँब (४०० एमजी) जवळफास ८० हजार रुपयांपर्यंत विकले जात होते. तर, रेमडेसिवीर विक्रीची परवानगीच नसल्याने निर्यातीसाठी तयार केलेले किंवा बांगलादेशातून आणलेल्या औषधांची ३० ते ४० हजार रुपयांनाही (सात ते आठ पट जास्त किंमतीत) विक्री केली जात होती. परंतु, आता मनमानी किंमतीतला हा काळाबाजार जवळपास बंद झाला आहे.

औषधांचा तुटवडा नाही

राज्य सरकारच्या टास्क फोर्सने ही दोन्ही औषधे कोणत्या रुग्णांना, कधी आणि किती प्रमाणात द्यायचे याची मार्गदर्शक तत्वे निश्चित केली आहेत. तसेच, या औषधांच्या अनियंत्रित वापराचे दुष्परिणामही सांगण्यात आल्याने त्यांचा वापरही नियंत्रणात आला आहे. गेल्या काही दिवसांत विशेषतः मुंबई शहरांतील रुग्णसंख्यासुध्दा कमी झाल्याने औषधांची मागणीसुध्दा घटली आहे. औषध निर्मिती कंपन्यांनी थेट रुग्णालयांमार्फत पुरवठा करत असून रुग्णांच्या कागदपत्रांची पडताळणी केल्याशिवाय औषध उपलब्ध करून दिले जात नाही. या सर्व कारणांमुळे मुंबई आणि महानगर क्षेत्रातील कोरोना औषधांचा काळाबाजार थांबला असून या औषधांचा तुटवडा नसल्याची माहिती राज्य शासनाच्या टास्क फोर्सचे सदस्य आणि फोर्टीस हाँस्पिटलच्या इंन्टेसीव केअर युनिटचे प्रमुख डाँ. राहूल पंडित यांनी सांगितले.

औषधांसाठीची धडपड थांबली

जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तीन भारतीय कंपन्यांनी रेमडेसीवीर औषध ४५०० ते ५६०० रुपये किंमतीत उपलब्ध करून देण्यास सुरूवात केल्यानंतर औषधांची उपलब्धता वाढली आहे. औषधांसाठी रुग्णांच्या नातेवाईकांना वणवण करावी लागते असे कुठे दिसत नाही. जून जुलै, महिन्यांत सोशल मीडीयावर औषधे कुठे उपलब्ध होतील असे मेसेज सतत येत होते. तेसुध्दा आता येत नाहीत. औषधांचा काळाबाजार रोखण्यासाठी दिलेल्या हेल्पलाईन क्रमांकावरही तक्रारी येत नसल्याचे एफडीएच्या अधिका-यांनी सांगितले. औषधांचा काळाबाजार करण्याचे प्रमाण वाढल्यानंतर पोलीस तसेच अन्न व औषध प्रशान विभागाने संयुक्त कारवाई करून ठाणे, मीरा रोड, मुंबईत सापळा रचून भामट्यांना गजाआड टाकले होते. त्याचाही परिणाम झाल्याचे सांगितले जाते.

    

टॅग्स :औषधंकोरोना वायरस बातम्यामुंबईमहाराष्ट्र