Join us

लसणाची फोडणी महागच, शेवगा 400, तर मटार 140 रुपये किलो ; भाजीपाल्याची आवक कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2024 09:16 IST

मार्गशीर्षमुळे मागणी वाढण्याचा अंदाज

प्रतिज्ञा पवार

मुंबई : यंदा परतीच्या पावसाने राज्याच्या अनेक भागांना झोडपून काढल्याने त्याचा विविध पिकांसह भाजीपाल्याच्या उत्पादनावर परिणाम झाला. त्यामुळे भाज्यांची आवक घटल्यामुळे भाज्यांचे दर कडाडले होते. त्यातच आता मार्गशीर्ष सुरू होत असून, या महिन्यातील व्रतामुळे अनेक कुटुंबीयांकडून मांसाहार वर्ज्य केला जातो. परिणामी भाजीपाल्याच्या वाढत्या मागणीमुळे त्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता व्यापारी आणि विक्रेत्यांकडून वर्तविली जात आहे.

सध्या मुंबई शहर आणि उपनगरांतील घाऊक बाजारात सर्वच भाज्या १०० ते १२० रुपये प्रतिकिलोंवर पोहोचल्या आहेत, तर किरकोळ बाजारातही भाज्यांच्या किमती दुप्पट झाल्या आहेत. लसणाचा भाव प्रतिकिलोसाठी ५०० रुपये, तर मटारचा भाव १४० रुपये प्रति किलो आहे. फुलकोबीची दरवाढ कायम असून, पावकिलोसाठी ३० रुपये मोजावे लागत आहेत. पावकिलो कोबीसाठी ३५ रुपये, चवळी आणि गवार ३० ते ३५ रुपये, तर पडवळ ५० रुपयांना मिळत आहे.

मिरचीचा ठसकाही कायम असून, पावकिलोचा दर ४० रुपये आहे. थंडीचा हंगाम आणि गुणकारी फायद्यामुळे शेवग्याला बाजारात मागणी आहे. मात्र, शेवग्याचा भाव ४०० रुपये प्रति किलोपर्यंत वधारला आहे.

पालेभाज्याही आवाक्याबाहेर

पालेभाज्यांचे दरही यंदा चढेच आहेत. ऑक्टोबर महिन्यामध्ये कोथिंबीरचा दर ४० ते ५० रुपये होता, नोव्हेंबरमध्ये  कोथिंबीरची जुडी ५० ते ६० रुपयांनी मिळत आहे. मेथी आणि पालक ३५ रुपये प्रतिजुडी मिळत होती. मात्र आता त्यात प्रतिजुडी ५ ते १० रुपयांची वाढ झालेली दिसत आहे. त्यामुळे भाज्या सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्याचे पाहायला मिळत आहेत.

लागवडीस विलंब

राज्यातील काही भागांना ऑक्टोबरमध्ये परतीच्या पावसाने झोडपून काढले. त्यामुळे भाज्यांची लागवड करण्यास शेतकऱ्यांना उशीर झाला. त्यामुळे वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून मुंबईत भाज्यांची

आवक कमी झाली आहे. त्यात मार्गशीर्षतील व्रतामुळे अनेक कुटुंबीयांचा शाकाहारावर भर असतो. त्यामुळे भाज्यांची मागणी वाढते; पण यंदा भाज्यांची आवक कमी झाल्यामुळे दरांमध्ये वाढ झाली आहे.

- राम गायकवाड, भाजी व्यापारी

  भाजी नोव्हेंबर ऑक्टोबर

मटार   १०० ते १४०     १०० ते १२०

सुरण   ५० ते ६०       ४० ते ५०

भेंडी    ८० ते १००      ८० ते ९०

वांगी    ८० ते ९०       ७० ते ८०

गवार   १०० ते १३०     १०० ते १२०

टोमॅटो   ५० ते ६०       ४० ते ५०

कांदा    ६० ते ७०       ६० ते ७०

बटाटे   ४० ते ५०       ३० ते ४०