महेश कोले लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या अनेक स्थानकांबाहेरचा परिसर रिक्षा, टॅक्सी आणि फेरीवाल्यांनी बळकावला आहे. त्यामुळे प्रवासी हैराण झाले आहेत. लोकलमध्ये जागा मिळवण्यासाठी आधी धक्काबुक्की, भांडणे करावी लागतात आणि स्टेशनमधून बाहेर पडल्यावर रस्त्यावर चालण्यासाठी झगडावे लागते. मात्र याकडे रेल्वे, वाहतूक पोलिस, महापालिका प्रशासन कोणीही गांभीर्याने पाहात नाही. त्यामुळे नेमका जाब कोणाला विचारायचा? हाच प्रश्न प्रवाशांना पडला आहे.
वांद्रे स्थानकाच्या पूर्वेकडे रिक्षा चालकांनी रोज सकाळी आणि सायंकाळी उच्छाद मांडल्याचे चित्र असते. संपूर्ण परिसरामध्ये त्यांच्यामुळे वाहतूक कोंडी होते. परिणामी, बेस्ट बस, खासगी गाड्यांची रांग लागते. प्रवाशांना चालण्यासही जागा नसते. त्यामुळे नोकरदारांना ऑफिस गाठताना त्रास सहन करावा लागतो. याठिकाणी आरटीओ, वाहतूक पोलिस यांच्याकडून ठोस कारवाई होत नसल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. रिक्षाचालक तर नियम धाब्यावर बसवून जादा प्रवासी घेत बेशिस्तपणे रिक्षा चालवतात. त्यामुळे जीव मुठीत घेऊन चालावे लागत असल्याचे प्रवासी सांगतात.
उघड्यावरच बनवतात खाद्यपदार्थ मस्जिद, सॅण्ड हर्स्ट रोड स्टेशनबाहेरही वाहतूक कोंडी कायम असते. मस्जिद येथे गल्लीमध्ये तर उघड्यावरच गॅस सिलिंडरचा वापर करत खाद्यपदार्थ बनवले जातात. त्यामुळे गर्दीच्या वेळेत एखादी अनपेक्षित घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.
बेकायदा पार्किंगप्रभादेवी, लोअर परळ स्टेशनबाहेर बेकायदा बाइक पार्किंगमुळे भागातून चालण्यासाठीही जागा उरत नाही. याठिकाणी वाहतूक पोलिसांकडून कारवाई का केली जात नाही? असा प्रश्नही उपस्थित करण्यात येत आहे.
झवेरी बाजारमध्ये कामावर जाण्यासाठी मस्जिद स्टेशनवर उतरून नेहमी जातो. अगोदर लोकलमध्ये धक्के खावे लागतात आणि नंतर रस्त्यावर. फेरीवाल्यांनी तर रस्त्यावर दुकाने मांडली आहेत. त्यामुळे गाड्या पुढे जात नाहीत. - रोहित उतेकर, प्रवासी