Join us

मुंबई विमानतळावरील गर्दी पुन्हा वाढली; टर्मिनल १ पूर्ण क्षमतेने सुरू करण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2021 07:27 IST

टर्मिनल १ पूर्ण क्षमतेने सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जाऊ लागली आहे.

मुंबई : गेल्या शुक्रवारी झालेल्या अभूतपूर्व गोंधळानंतर मुंबई विमानतळ प्रशासनाने गर्दीचे नियोजन करण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या. परंतु, शनिवारी पुन्हा तशाच प्रकारची गर्दी दिसून आली. त्यामुळे टर्मिनल १ पूर्ण क्षमतेने सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जाऊ लागली आहे.गर्दीच्या नियोजनासाठी मुंबई विमानतळाचे टर्मिनल १ मुदतीआधी खुले करण्यात आले असले, तरी सध्या केवळ गो फर्स्ट आणि एअर एशियाची विमाने तेथून उड्डाण घेत आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दीचे विभाजन होत नसल्याने टर्मिनल २ वरील भार तितकासा हलका झालेला नाही. शिवाय १६ ऑक्टोबरपासून पुढील १४ दिवस पुणे विमानतळ बंद असल्याने त्याचा अतिरिक्त भारही मुंबईवर येत आहे. त्यामुळे शनिवारी पुन्हा गर्दी वाढल्याची माहिती विमानतळाशी संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.टर्मिनल १ पूर्ण क्षमतेने खुले केल्यास या अतिरिक्त गर्दीवर नियंत्रण आणणे शक्य आहे. त्यासाठी इंडिगोची काही विमाने येथे वळवावी लागतील. कारण येत्या काही दिवसांत आंतरराष्ट्रीय प्रवासी विमानांवरील निर्बंध शिथिल केल्यास त्याचा भार टर्मिनल २ वर पडणार आहे, असेही त्यांनी सांगितले. यासंदर्भात मुंबई विमानतळाच्या प्रवक्त्यांशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.४० मिनिटांत ‘चेक-इन’ शनिवारी सकाळी टर्मिनल २ वर चेक इन करण्यासाठी जवळपास ४० मिनिटे लागत. गेल्या शुक्रवारच्या घटनेनंतर मुंबई विमानतळाने येथे अतिरिक्त सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. त्यामुळे हा कालावधी २० मिनिटांवर आला होता. परंतु, पुन्हा गर्दी वाढू लागल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली.अतिरिक्त सुविधा अशीगर्दीच्या नियोजनासाठी मुंबई विमानतळ प्रशासनाने सिक्युरिटी हँडलिंग एरियामध्ये अतिरिक्त कर्मचारी तैनात केले आहेत.सामानाचे जलद स्कॅनिंग होण्यासाठी अतिरिक्त एक्स-रे मशीन बसविण्यात आली आहेत. प्रवाशांनी विमानतळावर लवकर येऊन चेक-इन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वारंवार रिमाइंडर देण्याची सूचना विमान कंपन्यांना करण्यात आली आहे. सुरक्षा हाताळणीमध्ये विलंब टाळण्यासाठी ‘केबिन लगेज चेक-इन’ला परवानगी दिली आहे.