केंद्रीय मंत्र्यांच्या सभेला पैसे देऊन जमवली गर्दी
By Admin | Updated: October 7, 2014 00:24 IST2014-10-07T00:24:32+5:302014-10-07T00:24:32+5:30
अंबरनाथ मतदारसंघातील रिपाइं-भाजपाचे उमेदवार राजेश वानखेडे यांच्या प्रचारासाठी केंद्रीय मंत्र्यांना बोलाविण्यात आले होते.

केंद्रीय मंत्र्यांच्या सभेला पैसे देऊन जमवली गर्दी
अंबरनाथ: अंबरनाथ मतदारसंघातील रिपाइं-भाजपाचे उमेदवार राजेश वानखेडे यांच्या प्रचारासाठी केंद्रीय मंत्र्यांना बोलाविण्यात आले होते. या सभेला गर्दी होत नसल्याने सभेच्या आयोजकांनी पैसे देऊन काही महिला आणि लहान मुलांना बोलविले होते. तरीदेखील निम्म्यापेक्षा जास्त खुर्च्या रिकाम्या होत्या.
अंबरनाथमध्ये भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस येणार होते. मात्र, ते या सभेला येऊ न शकल्याने केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री संतोष गंगवार आणि दिल्ली भाजपाचे माजी अध्यक्ष ब्रिजेश गुप्ता यांना या सभेसाठी पाठविण्यात आले. दुपारी ३ वाजताची सभा एक तास उशिराने सुरू करण्यात आली. त्यातही निम्म्यापेक्षा जास्त खुर्च्या रिकाम्या होत्या. सभेला गर्दी होत नसल्याची चिंता खुद्द उमेदवार राजेश वानखेडे यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. अखेर, फोनाफोनी झाल्यावर काही महिलांना या सभेसाठी घोळक्याने आणण्यात आले. तरीदेखील खुर्च्या रिकाम्याच राहिल्या. गर्दीची वाट न पाहताच ही सभा सुरू झाली. उपस्थित मान्यवरांनी रिकाम्या खुर्च्यांसमोरच आपली भाषणे ठोकली. केंद्रीय मंत्र्यांचे भाषण सुरू असतानाच पुढच्या रांगेत बसलेल्या ४० ते ५० महिला कंटाळून मैदानाबाहेर पडल्या. सभा संपल्यावर आयोजकांकडून पैसे मिळविण्यासाठी महिला सभेच्या ठिकाणी बसून राहिल्या.गर्दी करण्यासाठी ज्या तीन महिलांनी पुढाकार घेऊन ३० ते ४० महिला आणल्या होत्या, त्या तिघींचा वाद आयोजकांसोबत झाला.
लोकमतने फोडले बिंग: ज्या महिलांना पैशांचे आश्वासन देऊन सभेच्या ठिकाणी आणण्यात आले होते, त्यांच्या एजंट लोकमतशी संवाद साधताना म्हणाल्या की, आम्ही यांना ३०० रुपयांचे आश्वासन देऊन घेऊन आलो. मात्र, ते आम्हाला अवघे २०० रुपये देत होते. त्यावरून महिला रागावल्या. तसेच या महिला रिक्षाने आलेल्या असतानाही त्यांना भाड्याचे पैसे देण्यासाठी टाळाटाळ करण्यात आली. त्यांची समजूत घातल्यावर मिळेल तेवढे पैसे घेऊन त्या गेल्या.