Join us
Daily Top 2Weekly Top 5

शंभर, दहा, पाचच्या जुन्या नोटा जमा करण्यासाठी गर्दी; बँकांमध्ये ग्राहकांची झुंबड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2021 07:13 IST

सर्वसामान्यांना नोटाबंदीची आठवण, ज्याप्रमाणे ५०० व १०००च्या नोटा चलनातून बंद केल्यानंतर बँकांच्या बाहेर रांगा लावाव्या लागल्या होत्या, त्याचप्रमाणे आताही रांगा लावाव्या लागणार का, ही भीती सर्वसामान्यांच्या मनात दाटून आली आहे.

मुंबई : मार्च महिन्यानंतर शंभर, दहा व पाचच्या जुन्या नोटा चलनातून हद्दपार करण्यासंबंधी प्रक्रिया सुरू असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी रिझर्व बँक ऑफ इंडिया व्यवस्थापनाने दिली होती. यासंबंधी माध्यमांवर बातम्या झळकल्यानंतर पुन्हा एकदा सर्वसामान्यांच्या मनात गोंधळ सुरू झाला आहे. 

ज्याप्रमाणे ५०० व १०००च्या नोटा चलनातून बंद केल्यानंतर बँकांच्या बाहेर रांगा लावाव्या लागल्या होत्या, त्याचप्रमाणे आताही रांगा लावाव्या लागणार का, ही भीती सर्वसामान्यांच्या मनात दाटून आली आहे. यासाठी नागरिक आपल्याजवळील जुन्या शंभर, दहा व पाचशेच्या नोटा बँकांमध्ये जमा करण्यासाठी गर्दी करू लागले आहेत. रिझर्व बँक ऑफ इंडियाने यासंबंधी अद्यापही कोणती स्पष्ट सूचना जारी केली नसली तरीही सर्वसामान्य नागरिक व व्यापारी यांमध्ये गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळत आहे. काही महिन्यांपूर्वी २०००च्या नोटा चलनातून हद्दपार होणार असल्याची अफवा उडाली होती. यामुळे अनेक व्यापाऱ्यांनी २०००च्या नोटा घेणे बंद केले होते. त्याचप्रमाणे आतादेखील काही व्यापारी जुन्या शंभर, दहा व पाचच्या नोटा स्वीकारण्यास मनाई करत आहेत. यामुळे ग्राहकदेखील गोंधळले आहेत.

जुन्या शंभर, दहा व पाचच्या नोटा जमा करणे वाढलेमाध्यमांवर बातम्या झळकल्यानंतर सर्वसामान्य ग्राहकांना पुन्हा नोटबंदीचे दिवस आठवल्याने नागरिक जुन्या शंभर, दहा व पाचच्या नोटा जमा करण्यासाठी बँकांमध्ये येऊ लागले आहेत. त्याचप्रमाणे काही व्यापाऱ्यांनीदेखील खबरदारी म्हणून या नोटा स्वीकारणे बंद केले आहे. यामुळे बँकांमध्ये जुन्या नोटा जमा करण्याचे प्रमाण वाढले आहे.

बँकांना काही सूचना मिळाल्या आहेत का?जुन्या नोटा बंद होण्यासंबंधी सर्व बँकांना अद्यापही कोणतीही सूचना मिळालेली नाही. जुन्या नोटा बंद होणार असल्याच्या बातम्या तसेच व्हॉट्सॲप फॉरवर्डद्वारे बँक कर्मचाऱ्यांना माहिती मिळालेली आहे. परंतु रिझर्व बँक ऑफ इंडियाने जुन्या नोटा बंद होण्यासंबंधी अद्याप कोणतेही अधिकृत परिपत्रक जारी केलेले नाही.

जुन्या नोटा चलनातून हद्दपार होणार असल्याची बातमी वर्तमानपत्रात वाचली होती याची शहानिशा करण्यासाठी बँकेशी संपर्क साधला असता अधिकृतरीत्या अशी कोणतीही घोषणा झाली नसल्याचे मला कळले. यामुळे मी अद्यापही जुन्या नोटा स्वीकारणे बंद केले नाही.  गोंधळून जाण्याची आवश्यकता नाही.- जयराम तुपे, व्यापारी 

 ग्राहक गोंधळलेले आहेत. आम्ही ग्राहकांकडून जुन्या नोटा स्वीकारत आहोत. मात्र आमच्याकडून ग्राहक जुन्या नोटा स्वीकारण्यास तयार नाहीत. यामुळे मागील काही दिवसांपासून ग्राहक व व्यापाऱ्यांमध्ये वाद होण्याचे प्रमाण वाढले आहे. आरबीआयने यासंबंधी स्पष्ट माहिती जाहीर करावी. - प्रकाश धनवानी, व्यापारी 

शंभर, दहा व पाचच्या जुन्या नोटा बंद होण्याची माहिती आम्हाला बातम्यांमधूनच कळली आहे. आरबीआयने स्पष्ट केल्याशिवाय ही प्रक्रिया सुरू होणार नाही. ग्राहकांनी आतापासूनच बँकांमध्ये गर्दी करणे चुकीचे आहे. विशेष म्हणजे काही समाजकंटकांकडून यासंबंधी विविध अफवाही पसरविल्या जात आहेत. ग्राहकांनी कोणत्याही अफवेवर विश्वास ठेऊ नये, अशी माहिती बँक अधिकाऱ्यांनी दिली आहे.

टॅग्स :बँक