मुंबई : मालाड येथील खोत डोंगरी को-ऑप. हौसिंग सोसायटीच्या ५६०० चौ. मी. सेल प्लॉटच्या एसआरए प्रकल्पाच्या नावाखाली ५.५ कोटींची फसवणूक केल्याच्या आरोपावरून शाह हाऊसकॉन प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक मनसुख एच. शाह व आकाश मनसुख यांच्याविरोधात कस्तुरबा मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तसेच एकाच प्रकल्पावर अनेक करार केल्याचाही आरोप आहे. आर्थिक गुन्हे शाखा याप्रकरणी तपास करत आहे.
क्लासिक ट्रिझर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक निलेश नरेंद्र राधानी (४७) यांच्या तक्रारीनुसार, मार्च २०२५ मध्ये दोन्ही कंपन्यांमध्ये ओळख झाल्यानंतर संबंधित प्रकल्पातील सुमारे ५६०० चौ. मी. सेल प्लॉटच्या विकासाबाबत करार करण्यात आला. गेल्यावर्षी ६ मे रोजी टर्मशीट, १७ मेला एमओयू आणि १६ जुलै रोजी पूरक एमओयू केला. प्रकल्पासाठी आवश्यक परवानग्या व झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन करण्याची जबाबदारी शाह हाऊसकॉनवर होती. करारानुसार क्लासिक ट्रिझरने मे ते जुलै २०२५ दरम्यान एकूण ५.१५ कोटी रुपये अदा केले. मात्र, प्रकल्पासंबंधी आवश्यक असलेली कामे पूर्ण करण्यात आली नसल्याचे तक्रारीत नमूद आहे.
२५ कोटींची मागणी
मनसुख व आकाश यांच्याशी पुनर्विकासाबाबत योग्य मार्ग काढण्यासाठी संपर्क साधून, मीटिंग घेतल्या. यावेळी त्यांनी २५ कोटी देण्याबाबत सांगून ॲडव्हान्समध्ये दोन कोटींची मागणी केली. त्याला स्पष्ट नकार देताच त्यांनी करार रद्द करत फसवणुकीचा आरोप आहे.
उच्च न्यायालयात याचिका
काही झोपडपट्टीधारकांनी पुनर्वसन न मिळाल्याने उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केल्याची माहिती तक्रारदारांनी दिली आहे. पुढे अतिरिक्त २५ कोटी रुपयांची मागणी करून दबाव टाकल्याचा व धमकी दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
दरम्यान, ऑक्टोबरमध्ये शाह हाऊसकॉनकडून टर्मशीट व एमओयू
रद्द केल्याची नोटीस पाठवण्यात आली. या संपूर्ण प्रकारात विश्वासघात व फसवणूक झाल्याचा आरोप करत संबंधित संचालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी तक्रारदारांनी केली आहे.
Web Summary : A fraud case has been filed against Shah Housecon directors for allegedly defrauding ₹5.5 crore in an SRA project. Classic Treasure Pvt. Ltd. alleges multiple agreements were made for the same project, and ₹25 crore was demanded. Some slum dwellers filed petitions in court.
Web Summary : शाह हाउसकॉन के निदेशकों पर एसआरए परियोजना में 5.5 करोड़ रुपये की धोखाधड़ी का मामला दर्ज। क्लासिक ट्रेजर प्रा. लि. का आरोप है कि एक ही परियोजना के लिए कई समझौते किए गए, और 25 करोड़ रुपये की मांग की गई। कुछ झोपड़ीवासियों ने अदालत में याचिकाएं दायर कीं।