Join us
Daily Top 2Weekly Top 5

माझ्या हत्येचा कट रचला, अनिल गोटेंचा भाजपा नेत्यांवर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2018 15:49 IST

भाजपाचे माजी नेते आणि आमदार अनिल गोटे यांनी भाजपा नेत्यांवर गंभीर आरोप केले आहे.

धुळे- भाजपाचे माजी नेते आणि आमदार अनिल गोटे यांनी भाजपावर गंभीर आरोप केले आहे. माझ्या हत्येचा कट रचला गेला. भाजपा नगरसेविका प्रतिभा चौधरींच्या मुलानं माझ्या हत्येची सुपारी दिली, असं म्हणत त्यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. धुळ्यात गुंड आयात करून तिकिटं दिली जात आहेत. पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करूनही माझ्या हत्येचा कट रचणाऱ्यांवर अद्याप कारवाई झालेली नाही.मी छोटा राजन आणि दाऊदलाही घाबरलो नाही. तर यांना काय घाबरणार, असं म्हणत त्यांनी सुभाष भामरे, गिरीश महाजन आणि जयकुमार रावलांवर गंभीर आरोप केले आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वीही त्यांनी विधानसभेत रावसाहेब दानवेंवर निशाणा साधला होता. भाजपाचे आमदार अनिल गोटे यांनी विधानसभेत भाजपा नेत्यांवर जोरदार टीकास्त्र सोडले होते. रावसाहेब दानवे यांनी 40 गुंडांना भाजपामध्ये प्रवेश दिल्याचा आरोप अनिल गोटे यांनी विधानसभेत केला होता. भाजपामध्ये प्रवेश दिलेल्या या गुंडांपैकी 28 जणांवर 302, 307, 352 असे विविध स्वरुपाचे गंभीर गुन्हे दाखल झालेले आहेत.भाजपामध्ये आल्यावर वाल्याचा वाल्मिकी होतो, असा दावा करण्यात येतो. मात्र, एका वाल्याचा वाल्मिकी होईल, सर्वच गुन्हेगार कसे काय वाल्मिकी होतील, असा सवाल करत अनिल गोटे यांनी रावसाहेब दानवे यांच्यावर निशाणा साधला होता. माझ्यासह माझ्या पत्नीची बदनामी करण्यात येत आहे. ही बदनामी करणारे कोणी बाहेरचे नसून पक्षातीलच लोक करत आहेत. 

टॅग्स :अनिल गोटे