शेतक-यांवर अस्मानी संकट
By Admin | Updated: April 19, 2015 23:17 IST2015-04-19T23:17:09+5:302015-04-19T23:17:09+5:30
बंगालचा उपसागर, अरबी समुद्र आणि कॅस्पियन समुद्रात गेल्या चार दिवसांपासून निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे संपूर्ण देशावर पूर्वमोसमी पावसाचे ढग दाटून आले आहेत

शेतक-यांवर अस्मानी संकट
दत्ता म्हात्रे, पेण
बंगालचा उपसागर, अरबी समुद्र आणि कॅस्पियन समुद्रात गेल्या चार दिवसांपासून निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे संपूर्ण देशावर पूर्वमोसमी पावसाचे ढग दाटून आले आहेत. त्याचा परिणाम म्हणून पेणमध्ये सायंकाळी आभाळ मेघाच्छादित दिसत होते. जोरदार वादळी वारे व अंधार दाटून आला. गेल्या महिन्यात अवकाळीनंतर पूर्वमोसमी पावसाचे संकट चालून आल्याने या परिस्थितीचा खरीप हंगामावर विपरीत परिणाम होण्याची दाट शक्यता आहे.
खरीप हंगामाचा पिकविलेला भात शासनाने हमीभाव भात खरेदी केंद्र सुरू न केल्यामुळे कमी भावात दलालांना विकला गेला. शेतीचा वाढत जाणारा उत्पादन खर्च व प्रत्यक्ष शेती मालाला मिळणारा कमी भाव हीच परिस्थिती पाहावयास मिळत आहे. गेली दोन वर्षे नैसर्गिक आपत्तीची संकटामागून संकटे शेतकऱ्यांवर येत आहेत. वातावरणीय बदलांमुळे शेती कशी करावी, अतिवृष्टी, अवर्षण, अवकाळी आणि आता पूर्वमोसमी पाऊस शेतकऱ्यांच्या मुळावर उठल्याने शेतीमध्ये शाश्वत उत्पन्नाची हमी राहिली नाही.
निसर्गातील प्रत्येक घटकांचे संतुलन बिघडल्याने पडणारा पूर्वमोसमी पाऊस येणाऱ्या खरीप हंगामातील पावसाचे चित्र बदलू शकतो. अवकाळी पाऊस व पूर्वमोसमी पावसाच्या तडाख्याने उद्ध्वस्त झालेल्या बळीराजाला या सतत उद्भवणाऱ्या वातावरणीय बदलाचे परिणाम भोगावे लागतात.