दहीहंडी आयोजकांविरुद्ध गुन्हे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:12 IST2021-09-02T04:12:33+5:302021-09-02T04:12:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सव साजरा करण्यावर बंदी घालण्यात आली होती. असे ...

दहीहंडी आयोजकांविरुद्ध गुन्हे दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सव साजरा करण्यावर बंदी घालण्यात आली होती. असे असताना विरोधकांकडून सरकारच्या निषेधार्थ दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. यात, मुंबई पोलिसांकडून दादर, वरळी, घाटकोपर, कस्तुरबा मार्ग, भांडूप, मुलुंडसह विविध पोलीस ठाण्यात आयोजकांसह कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सण-उत्सवाच्या काळात गर्दीवर नियंत्रण आणण्याच्या सूचना केंद्र सरकारने दिल्या आहेत. असे असताना देखील दहीहंडी साजरी करण्याबाबत भाजप आणि मनसेने आक्रमक पवित्रा घेतलेला पहावयास मिळाला. मनसेने सर्व निर्बंध झुगारत काळाचौकी, मुलुंड, भांडूप, दादर, वरळीसह विविध भागात दहीहंडी फोडली.
मनसे नेते बाळा नांदगावकर दहीहंडी फोडण्यासाठी आणि उत्सव साजरा करण्यासाठी मुंबई काळाचौकी परिसरातील मैदानात दाखल झाले. यावेळी जमलेली गर्दी बघता पोलिसांनी त्यांना अडवले. आम्ही आमचे सण साजरे करणारच; प्रतीकात्मक दहीहंडी फोडू द्या, अशी मागणी देखील नांदगावकर यांनी केली. मात्र, ती नाकारत पोलिसांनी मनसे नेते बाळा नांदगावकर यांना ताब्यात घेतले. मात्र, परंपरेप्रमाणे कमी उंचीची दहीहंडी बांधून ती फोडण्यात आली. जमावबंदीचे आदेश झुगारून मनसेसैनिकांनी घोषणा देत ही दहीहंडी फोडली. त्यामुळे पोलिसांनी मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्यासह मुंबईत विविध ठिकाणी दहीहंडी फोडणाऱ्या मनसेच्या कार्यकर्त्यांसह गोविंदांना ताब्यात घेतले होते. कलम १८८, १४१,१४३,१४९ भादवि सह आपत्ती व्यवस्थापन अधिनियम कलम ५१ (अ) सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम अ (१) (३) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.