कार्यकर्त्यांवरचे गुन्हे चुकीचे - जितेंद्र आव्हाड
By Admin | Updated: January 7, 2015 01:57 IST2015-01-07T01:57:19+5:302015-01-07T01:57:40+5:30
महापौर दालनाबाहेर राष्ट्रवादीने आंदोलन केल्यानंतर पोलिसांनी रात्री उशिराने राष्ट्रवादीच्या तीन कार्यकर्त्यांना अटक केली.
कार्यकर्त्यांवरचे गुन्हे चुकीचे - जितेंद्र आव्हाड
ठाणे : महापौर दालनाबाहेर राष्ट्रवादीने आंदोलन केल्यानंतर पोलिसांनी रात्री उशिराने राष्ट्रवादीच्या तीन कार्यकर्त्यांना अटक केली. परंतु पोलिसांनी त्यांच्यावर जे गुन्हे दाखल केले ते चुकीचे असल्याचा आरोप आता आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला. रात्री दीड वाजता त्यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह ठाणे नगर पोलीस ठाण्यात आंदोलन केले.
सत्ताधाऱ्यांच्या राजकीय दबावापोटी पोलिसांनी जे गुन्हे दाखल केले आहेत, ते चुकीचे असून याचा निषेध करीत वेळ पडल्यास शिवसेनेला त्यांच्या पध्दतीने जाब देऊ असा इशाराही त्यांनी दिला आहे. या आंदोलनाप्रकरणी लोकशाही आघाडीच्या २०० कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मागील महिन्यात झालेल्या महासभेत पालिकेचे आर्थिक उत्पन्न ढासळल्याच्या मुद्यावरुन महासभेत गदारोळ झाला होता. परंतु याचवेळेस महापौरांच्या दालनात आमदार, खासदारांबरोबर बारवाल्यांची बैठक घेण्यात येऊन त्यांना संरक्षण देण्याच्या मुद्यावर एकमत झाले. त्यामुळे याचे पडसाद महासभेत उमटले. त्यानंतर सोमवारी राष्ट्रवादीने बिअर भेट आंदोलन केले. कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. रात्री उशिरा राष्ट्रवादीच्या तीन कार्यकर्त्यांना नौपाडा पोलिसांनी अटक केली. जमाव बंदी मनाई आदेश तोडल्याने आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह, कॉंग्रेसचे मनोज शिंदे, शहर अध्यक्ष बाळकृष्ण पूर्णेकर यांच्या गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.