Join us  

Mumbai: तरुणीने पोलिसालाच नेले फरफटत, घाटकोपरमधील धक्कादायक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2023 8:41 AM

Mumbai: विरुद्ध दिशेने दुचाकीवरून येणाऱ्या तरुणीला हटकल्याच्या रागात पोलिसांच्या अंगावर गाडी चढवत त्यांना फरफटत नेल्याची घटना घाटकोपरमध्ये घडली.

मुंबई :  विरुद्ध दिशेने दुचाकीवरून येणाऱ्या तरुणीला हटकल्याच्या रागात पोलिसांच्या अंगावर गाडी चढवत त्यांना फरफटत नेल्याची घटना घाटकोपरमध्ये घडली. या प्रकरणी टिळकनगर पोलिसांनी पूजा कीर्तेश संगाणी (वय २०) हिच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवत अधिक तपास करीत आहे. 

पोलिस शिपाई मनीषा संतोष गायकवाड (३५) यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवत अधिक तपास करीत आहे. गायकवाड या घाटकोपर येथील हवेली ब्रिजकडे कर्तव्य बजावत असताना शनिवारी साडेअकरा ते १२च्या दरम्यान ही घटना घडली. पूजा विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने येताना दिसताच गायकवाड यांनी तिला थांबविण्याचा प्रयत्न केला. तिने गायकवाड यांच्या अंगावर भरधाव वेगाने दुचाकी घालून त्यांना फरफटत नेले. यामध्ये त्यांच्या पायाला दुखापत झाली. यावेळी सहकारी महिला पोलिस शिपाई जाधव यांनी तिला पकडण्याचा प्रयत्न करताच तिने त्यांना लाथा मारल्या. तसेच गायकवाड यांनी तिला पकडताच त्यांच्या कानाखाली मारून शिवीगाळ केली. अन्य सहकाऱ्यांच्या मदतीने  अखेर तिला ताब्यात  घेतले. तरुणीविरुद्ध गुन्हा नोंदवत तिला ४१ (१) (अ) प्रमाणे नोटीस देऊन सोडण्यात आले आहे.

दादर पोलिस ठाण्यात धिंगाणा दादर पोलिस ठाण्याच्या उपनिरीक्षक गौरी विनायक दाते यांच्या फिर्यादीनुसार, शनिवारी मुख्य नियंत्रण कक्षाच्या संदेशान्वये ठाणे अंमलदार कक्षात आरोपी  मृगेंद्र प्रताप राणे, यांच्यावर भादंवि कलम २८५ अन्वये कायदेशीर कारवाई करत असताना त्याची पत्नी झोया तेथे आली. तिने पतीविरुद्ध सुरू असलेल्या कारवाईला विरोध केला. महिला पोलिसांच्या अंगावर धावून जात ‘तू पोलिस असशील तुझ्या घरी, माझ्याच नवऱ्याला का आणले, आम्ही धंदा करतो. तुमच्या बापाचं काय जातं? तुला दाखवते बाहेर भेटल्यावर,’ असे बोलून शिवीगाळ केली. तर, आरोपीनेही महिलेला शिवीगाळ केली. दोघेही त्यांना मारण्यासाठी धावून जाताच अन्य सहकाऱ्यांनी त्यांना पकडले. सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवत अटक केली.  पुढे, आरोपीना सीआरपीसी कलम ४१ (१) (अ) अन्वये नोटीस देऊन सोडून देण्यात आले आहे. 

टॅग्स :मुंबईपोलिस