गुन्हेगारीत कुर्ला, ठाणे आघाडीवर
By Admin | Updated: December 25, 2014 01:24 IST2014-12-25T01:24:07+5:302014-12-25T01:24:07+5:30
आतापर्यंत रेल्वे पोलिसांकडे २0१४ मध्ये मोठ्या प्रमाणात गुन्ह्यांची नोंद झाली असून, कुर्ला आणि ठाणे स्थानक आघाडीवर असल्याचे निदर्शनास आले

गुन्हेगारीत कुर्ला, ठाणे आघाडीवर
सुशांत मोरे, मुंबई
आतापर्यंत रेल्वे पोलिसांकडे २0१४ मध्ये मोठ्या प्रमाणात गुन्ह्यांची नोंद झाली असून, कुर्ला आणि ठाणे स्थानक आघाडीवर असल्याचे निदर्शनास आले आहे. २0१४ मध्ये (जानेवारी ते नोव्हेंबरपर्यंत) कुर्ला स्थानकात ४४५, तर ठाणे स्थानकात ४७0 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. २0१३ मध्ये जवळपास तेवढ्याच प्रमाणात गुन्ह्यांची नोंद झाल्याचे रेल्वे पोलिसांकडून सांगण्यात आले.
मध्य रेल्वेची मेन लाइन, हार्बर आणि पश्चिम रेल्वेमार्गावर एकूण ७५ लाख प्रवासी प्रवास करतात. मात्र या प्रवाशांना रेल्वेत अनेक गुन्ह्यांच्या घटनांना सामोरे जावे लागते. पाकीटमारी, चेन आणि मोबाइल चोरी, बॅग चोरी या सर्वाधिक गुन्ह्यांमुळे प्रवासी हैराण आहेत.
या गुन्ह्यांबरोबरच खून आणि खुनाचा प्रयत्न, असे गंभीर गुन्हेही रेल्वे स्थानक आणि त्या हद्दीत घडले आहेत. या गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. रेल्वेत घडणारे गुन्हे पाहता कुर्ला आणि ठाणे स्थानक आघाडीवर आहे. २0१४ मध्ये (जानेवारी ते नोव्हेंबरपर्यंत) रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर एकूण २ हजार ७५९ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. यात मध्य रेल्वे मेन लाइन आणि हार्बरवर मिळून १ हजार ९९४, तर पश्चिम रेल्वेमार्गावर ७६५ गुन्हे घडले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे कुर्ला स्थानकात ४४५ तर ठाणे स्थानकात ४७0 गुन्ह्यांची नोंद झाली असल्याचे रेल्वे पोलिसांकडून सांगण्यात आले. २0१३ मध्ये तर (जानेवारी ते डिसेंबर) एकूण २ हजार ६७६ गुन्ह्यांची नोंद झाली असून, कुर्ल्यात ४00 आणि ठाणे स्थानकात ३६५ गुन्ह्यांची नोंद झाल्याचे सांगण्यात आले.