एलबीटी चुकविणाऱ्यांवर दाखल होणार गुन्हे
By Admin | Updated: February 17, 2015 01:52 IST2015-02-17T01:52:02+5:302015-02-17T01:52:02+5:30
संस्थाकराच्या नोंदणीशिवाय माल आयात करून अथवा त्याची खरेदी-विक्री करून तो बुडवतील, त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे.

एलबीटी चुकविणाऱ्यांवर दाखल होणार गुन्हे
ठाणे : एलबीटीची वसुली करण्यासाठी आता ठाणे महापालिकेने आणखी कठोर पावले उचलली आहेत. जे व्यापारी स्थानिक संस्थाकराच्या नोंदणीशिवाय माल आयात करून अथवा त्याची खरेदी-विक्री करून तो बुडवतील, त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे.
ठाणे महापालिकेत १ एप्रिल २०१३ पासून हा कर लागू करण्यात आला आहे. परंतु, सुरुवातीपासून त्याला विरोध करून व्यापाऱ्यांनी तो भरण्यास नकार दिला. एकूणच त्यांच्या या भूमिकेमुळे पालिकेचा आर्थिक डोलारा कोसळून विविध विकासकामांवरदेखील त्याचा परिणाम झाला. आर्थिक वर्ष संपत आले असताना आता आयुक्त संजीव जयस्वाल यांनी यासंदर्भात कडक भूमिका घेऊन एलबीटी वसुलीसाठी एक टीम तयार केली आहे. त्यानंतर, जे विकासक एलबीटी चुकवतील, त्यांना शहर विकास विभागाकडून ओसी देण्यात येऊ नये, अशी भूमिका घेतली. त्यानुसार, शहर विकास विभागाने १७४ विकासकांना नोटिसा बजावल्याने त्यांच्याकडून आतापर्यंत २ कोटींहून अधिक रकमेची वसुली झाली आहे. यामुळे पालिकेच्या तिजोरीत एलबीटीपोटी ४४९.५३ कोटी जमा झाल्याची माहितीही देण्यात आली आहे.
दरम्यान, या कराच्या तरतुदीनुसार नोंदणीकृत व्यापारी नसताना माल आयात करणे, विक्री करणे अथवा माल पोहोचवणे, खोटे विवरणपत्र, देयके, अकाउंट्स, कागदपत्रे सादर करणे आदी बाबी निदर्शनास आल्यास त्यांच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले. त्वरित कर भरावा, असे आवाहन पालिकेने केले आहे.
स्थानिक संस्था कर बुडविण्यासाठी इतर व्यक्तींना साहाय्य करणे अथवा अशा प्रवृत्तींना प्रोत्साहन देणाऱ्या व्यक्तींविरुद्धही गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. शहरातील व्यापारी, उद्योग व्यावसायिकांनी स्थानिक संस्थाकराची नोंदणी करून त्वरित तो भरावा, असे आवाहन ठाणे महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.