संक्रमण शिबिरातील घुसखोरांवर दाखल होणार गुन्हे
By Admin | Updated: September 4, 2015 00:42 IST2015-09-04T00:42:10+5:302015-09-04T00:42:10+5:30
धारावी येथील संक्रमण शिबिरातील घुसखोर म्हाडा अधिकाऱ्यांच्या कारवाईला जुमानत नाहीत. कारवाईनंतरही पुन्हा घरांचा ताबा घेणाऱ्या घुसखोरांवर गुन्हे दाखल करण्याचा

संक्रमण शिबिरातील घुसखोरांवर दाखल होणार गुन्हे
मुंबई : धारावी येथील संक्रमण शिबिरातील घुसखोर म्हाडा अधिकाऱ्यांच्या कारवाईला जुमानत नाहीत. कारवाईनंतरही पुन्हा घरांचा ताबा घेणाऱ्या घुसखोरांवर गुन्हे दाखल करण्याचा निर्णय म्हाडाने घेतल्याने घुसखोरांना तुरुंगात जावे लागणार आहे.
म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे धारावीत संक्रमण शिबिर आहे. या शिबिरामध्ये घुसखोरी करणाऱ्यांवर म्हाडाने मे महिन्यात कारवाई केली होती. या कारवाईनंतरही येथील गाळे पुन्हा दलालांनी ताब्यात घेतले आहेत. दलालांनी इमारत क्रमांक ‘२/सी’मधील ५४, ‘५/ए’मधील २0, ‘६/ए’मधील ६४, ‘१/सी’ २६ आणि ‘१/ए’मधील २0 खोल्यांचे टाळे तोडून या खोल्या भाडेकरूंना दिल्या असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेत मंडळाच्या अधिकाऱ्यांनी घुसखोरांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.
दलाल म्हाडा अधिकाऱ्यांना धजावत नसल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. शासनाच्या आदेशानुसार पावसाळ्यामध्ये घुसखोरांना घराबाहेर काढता येत नाही. त्यामुळे पावसाळा उलटल्यानंतर घुसखोरांना घराबाहेर काढण्याची मोहीम हाती घेण्याचा निर्णयही म्हाडा अधिकाऱ्यांनी घेतला आहे.
खासगी सुरक्षा
म्हाडाने कारवाई केल्यानंतर काही दिवसांतच पुन्हा संक्रमण शिबिरात घुसखोरी होत आहे. घुसखोरांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी धारावी येथील संक्रमण शिबिराला खासगी सुरक्षा देण्याचा निर्णयही अधिकाऱ्यांनी घेतला आहे. याबाबतचा प्रस्ताव तातडीने तयार करून त्याला प्राधिकरणाची मंजुरी घेण्यात येणार असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.